भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये ठेकेदारीवरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 00:16 IST2021-02-18T00:15:49+5:302021-02-18T00:16:21+5:30
नाशिक : नगरसेवकांनी सुचवलेले कामगार न घेणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीला बिल अदा करण्याच्या विषयावर भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये शाब्दिक बोलाचाली झाल्याचे वृत्त आहे. महापौर, काही नगरसेवक आणि शहराध्यक्षांमध्ये काहीशी खडाजंगी झाल्यानंतर बैठक आटोपती घेण्यात आल्याचे समजते.

भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये ठेकेदारीवरून वाद
नाशिक : नगरसेवकांनी सुचवलेले कामगार न घेणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीला बिल अदा करण्याच्या विषयावर भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये शाब्दिक बोलाचाली झाल्याचे वृत्त आहे. महापौर, काही नगरसेवक आणि शहराध्यक्षांमध्ये काहीशी खडाजंगी झाल्यानंतर बैठक आटोपती घेण्यात आल्याचे समजते.
महापालिकेची मासिक महासभा गुरुवारी (दि. १८) होणार असून, त्यापूर्वी प्रथेप्रमाणे पक्षाच्या नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आऊटसोर्सिंगप्रकरणी वॉटर ग्रेस या कंपनीचे बिल रोखून धरण्याचे आदेश स्थायी समितीने दिले होते. त्यानंतरही हे बिल अदा झाल्याचे काही नगरसेवकांचे म्हणणे होते.
वॉटर ग्रेस कंपनी नगरसेवकांचे कामगार घेत नसल्याने अशाप्रकारे बिल कसे काय अदा झाले, यावरून हा वाद झाल्याचे समजते. संबंधित ठेकेदार हा महापौर, शहराध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांना विचारा असे उत्तर देतो, त्यामुळे त्याचा काय अर्थ घ्यायचा, असा काही नगरसेवकांचा सवाल होता, असे कळते. त्यावरून वाद वाढत गेल्यानंतर शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी महापौरांना देखील शांत राहण्यास सांगितले. त्यामुळे महापौर संतापले आणि तुम्हाला काय सांगायला जाते, मला महासभेला सामोरे जावे लागते, असे सांगितल्याने त्यांच्यातही दोन दोन शब्द झाल्याचे समजते.
यावेळी घरपट्टी खासगीकरणाच्या प्रस्तावावरून देखील वाद झाल्याचे समजते.