नाशिक : आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण दिल्यास राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी दिला.धनगर समाजास अनुसूचित जमातीत समाविष्ट न करता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, तसेच धनगर समाजास अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याला विरोध म्हणून आदिवासी महादेव कोळी समाज विकास संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून या मोर्चास प्रारंभ झाला. त्र्यंबक नाका सिग्नल, जिल्हा परिषद, कालिदास कलामंदिर, शालिमार, महात्मा गांधी रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे छोटेखानी सभेत रूपांतर झाले. या सभेत बोलताना माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी सांगितले की, आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्यास हरकत नाही. मात्र, आदिवासी समाजाच्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण दिल्यास आदिवासीबांधव राज्यभर आंदोलन करतील, असा इशारा पिचड यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. महादेव कोळी विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज अंडे, जिल्हा सरचिटणीस देवीदास वाटाणे, प्रवीण कडाळे, शांताराम चारोस्कर, दीपक श्रीखंडे, स्वप्नील सताळे, नामदेव ससाणे, शोन चारोस्कर आदिंसह नाशिक व शेजारील जिल्ह्यातील आदिवासीबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी मोर्चा मार्गातील रस्ता एकेरी केल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)
आदिवासी समाजात धनगरांना आरक्षण नको
By admin | Updated: April 10, 2015 00:17 IST