भक्तिसंगीताचा ‘स्वराभिषेक’
By Admin | Updated: December 1, 2015 23:46 IST2015-12-01T23:45:17+5:302015-12-01T23:46:26+5:30
स्वरसंगम : पं. शौनक अभिषेकी, पं. पणशीकर यांच्या मैफलीने गाठली उंची

भक्तिसंगीताचा ‘स्वराभिषेक’
नाशिक : ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’चा गजर झाला अन् यांच्या आलापाला दाद द्यावी की त्यांच्या तानेला, अशा सुखद खेळात रसिक रंगून गेले... पं. शौनक अभिषेकी आणि पं. रघुनंदन पणशीकर या दोघा दिग्गज गायकांच्या आगळी उंची गाठणाऱ्या मैफलीने रसिकांची अवस्था ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी करून टाकली...
के. के. वाघ कला अकादमीच्या वतीने आयोजित कर्मवीर कला महोत्सवाला आज ‘स्वरसंगम’ या भक्ती, नाट्य व भावसंगीताच्या मैफलीने प्रारंभ झाला. महाकवी कालिदास कलामंदिरात रंगलेल्या या मैफलीने रसिकांची जणू ब्रह्मानंदी टाळीच लागली. पं. शौनक अभिषेकी व पं. रघुनंदन पणशीकर यांनी वारकरी संप्रदायातील ‘जय जय रामकृष्ण हरी’ या गजराने मैफलीला एकत्रित प्रारंभ केला. या दोघांतील स्वरांच्या जुगलबंदीने रसिकांना पुढच्या दोन-अडीच तासांत कोणत्या प्रतीचे गायन ऐकायला मिळणार, याची जणू चुणूकच दाखवली. त्यानंतर पं. अभिषेकी यांनी संत तुकारामांच्या ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म... भेदाभेद भ्रम अमंगळ’ हा अभंग आपल्या खास शैलीत पेश केला. पं. पणशीकर यांनी सादर केलेल्या ‘अहो नारायणा सांभाळावे आम्हा दीना... आमुची राखावी ही लाज...’ या संत एकनाथांच्या अभंगाला रसिकांनी ‘वन्स मोअर’ दिले अन् टाळ्यांची साथ दिली. यानंतर संत सोहिरोबांचा ‘हरी भजनाविण काळ, घालवू नको रे’ हा अभंग पं. अभिषेकी यांनी सादर करीत मैफलीला उंचीवर नेऊन ठेवले. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या ‘देवाघरचे ज्ञान’सह ‘घेई छंद मकरंद’, ‘मुरलीधर श्याम’ ही नाट्यगीतेही सादर करण्यात आली.
मध्यंतरानंतर ‘हे श्याम सुंदरा’, ‘रंध्रात पेरिली’ ही भावगीते, ‘बाजे रे मुरलिया’, ‘श्याम तोरी मूरत’ ही भक्तिगीते, ‘अबीर गुलाल उधळीत’ हा अभंग अशी एकाहून एक पर्वणीच कानसेनांना अनुभवायला मिळाली. पं. अभिषेकी व पं. पणशीकर यांनी एकत्रित गायलेल्या ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ या गीताने मैफलीचा समारोप झाला. प्रशांत पांडव (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी), ज्ञानेश्वर दुधाणे (पखावज), रवींद्र पंडित (तालवाद्य) यांनी समर्थ संगीतसाथ केली. मिलिंद कुलकर्णी यांच्या रसाळ निरूपणाने मैफलीला रंगत आणली.
के. के. वाघ संस्थेचे उपाध्यक्ष काशीनाथ टर्ले, प्राचार्य केशव नांदूरकर, प्रा. विनायक सेउलीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)