संगमेश्वरात भाविकांचे मंदिराबाहेरूनच दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 17:53 IST2020-03-23T17:50:12+5:302020-03-23T17:53:43+5:30

मालेगाव : धार्मिक स्थळे बंद करण्याच्या आवाहनाला मंदिर व्यवस्थापनाने पूर्णपणे पाठींबा दिला आहे. भाविकांमुळे नेहमी गजबजलेल्या मंदिराचे पार सुने झाले आहेत. संगमेश्वरसह परिसरात विविध देव-देवतांची मंदिरे आहेत. पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी व विविध धार्मिक पूजा पाठ करण्यासाठी गर्दी होत असते. महादेव मंदिर, दत्त मंदिर, सप्तशृंगी देवी मंदिर, शनि मंदिर नेहमीच गजबजलेली असतात मात्र कोरोना विषाणुचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मंदिरे बंद करण्यात आली आहेत. भजन, हरिपाठ, आरती आदी नित्याचे कार्यक्रम बंद झाल्याने भाविक मंदिराच्या बाहेरुनच दर्शन घेत आहेत. मंदिराचे ओटे, पार भाविकांमुळे ओस पडले आहेत.

 The devotees meet outside the temple at Sangameshwar | संगमेश्वरात भाविकांचे मंदिराबाहेरूनच दर्शन

संगमेश्वरात भाविकांचे मंदिराबाहेरूनच दर्शन

दरम्यान आज संगमेश्वरसह परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने सकाळपासून बंद होती. रिक्षा वाहतूकही काही अंशी बंदच होती. रस्त्यावर नेहमी जाणवणारी वाहतुकीची वर्दळ आज नव्हती. दुचाकी व सायकलस्वारांची ये-जा सुरू होती. मेडिकल दुकाने, किराणा मालाची अत्यावश्यक दुकाने काही ठिकाणी सुरू होती. परिसरातील बांधकामेही बंद होती. रस्त्यावरुन ये-जा करणारे नागरिक तोंडाला मास्क वा रुमाल बांधून मार्गक्रमण करीत काळजी घेत होते. संगमेश्वर परिसरात मालेगाव महापालिकेच्या वतीने औषधांची धुरळणी करण्यात आली. परिसरातील सर्वच शैक्षणिक संस्था, सार्वजनिक वाचनालये गेल्या आठ दिवसांपासून बंदच आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संगमेश्वर परिसरातील सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. सावित्रीआई प्रतिष्ठानतर्फे याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत माहितीपर फलकाचे वाटप परिसरातील नागरिकांना करण्यात येत आहे. मारवाडी युवा मंच, मालेगाव महापालिकेचे मोठे फलक लावून मार्गदर्शन केले आहे. शहरभर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास नागरिकांना होतो. श्वसनाचे आजार,अस्थमा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. व्यापार, उद्योगामुळे मालेगावात संपूर्ण देशभरात व इतरही देशातुन लोक ये-जा करीत असतात त्यासाठीची खबरदारी घेणे गरजेचे आहे. आदीच विविध आजारांसाठी मालेगाव शहराचे नाव अग्रस्थानी असताना महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलून शहर स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लग्नसराईचा हंगाम सध्या जोरात आहे. नागरिक एकमेकांना भेटल्यानंतर हस्तांदोलन न करता हात जोडणे पसंत करुन काळजी घेत आहे. शुभ विवाहानंतर वधु-वर हनीमुनसाठी देशविदेशात पर्यटनासाठी जात असतात मात्र कोरोना व्हायरसच्या धास्तीने वधु-वरांनी वधुवरांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली आहे; मात्र त्याचा यामुळे हिरमोड होत आहे.

Web Title:  The devotees meet outside the temple at Sangameshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.