देवनदीत कार कोसळून चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:12 IST2020-12-29T23:22:10+5:302020-12-30T00:12:00+5:30
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात देवनदीच्या पुलावर कारला कुत्रे आडवे आल्यानंतर, कुत्र्याचा जीव वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून कार नदीपात्रात कोसळल्याची घटना मंगळवारी (दि.२९) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारचालक जागीच ठार झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर खोपडी शिवारात देवनदीच्या पात्रात कोसळलेली कार.
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात देवनदीच्या पुलावर कारला कुत्रे आडवे आल्यानंतर, कुत्र्याचा जीव वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून कार नदीपात्रात कोसळल्याची घटना मंगळवारी (दि.२९) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारचालक जागीच ठार झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नालासोपारा येथील पाच मित्र मारझो कारने (क्रमांक एम. एच. ४८ बी. टी. १४१३) शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना, सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात देवनदीच्या पुलावर सदर अपघात झाला. देवनदीच्या पुलावरून कार जात असताना, अचानक कुत्रे आडवे आले. कारचालकाने कुत्र्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात कार पुलाला धडकून लोखंडी कठडे तोडून देवनदीच्या पात्रात कोसळली. सुमारे २० फुट खोल नदीपात्रात कार खडकावर आदळल्याने मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालकांनी धाव घेऊन मदतकार्य केले.
वावी पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने कारमध्ये अडकलेल्या एका जखमीला बाहेर काढण्यात आले. या अपघातात कारचालक साहील अनिल ब्रीद (२४) रा. नालासोपारा हा जागीच ठार झाला, तर अनिषेक शुक्ला (२५) रा. जयंत नक्ती (२४) रा. नालासोपारा हे गंभीर जखमी झाले. जखमींना अधिक उपचारसाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश गवळी, सतीश बैरागी अधिक तपास करीत आहेत.