आरोग्य विद्यापीठामागील शुक्लकाष्ठ संपेना
By Admin | Updated: November 16, 2016 01:18 IST2016-11-16T01:22:34+5:302016-11-16T01:18:56+5:30
चौकशी : अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात

आरोग्य विद्यापीठामागील शुक्लकाष्ठ संपेना
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठावरील स्थलांतराचे आणि नंतर विभाजनाचे संकट टळले असले तरी विद्यापीठ आतून पोखरण्याची संधी शासनाला येथीलच काही कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या पात्रतेविषयी राजभवन आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडे शंका उपस्थित केल्यामुळे शासनाने नियुक्त केलेल्या समितीने पुन्हा एकदा येथील कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कारभाराबाबत मंत्रालयीन पातळीवर ढीगभर तक्रारी असल्यामुळे या विद्यापीठाकडे शासनाचे बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला चौकशीचा ससेमिरा अजूनही कायम आहे. शासन सेवेत नियुक्त करण्यात आलेल्या ५३ कर्मचाऱ्यांची पात्रता नसतानाही त्यांना बढती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. त्यातच पुढे ८३ पदांची भरती आणि फंडातील कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या हालचाली सुरू असताना अशा प्रकारच्या चौकशी सत्रामुळे या कामांनाही ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
या चौकशी सत्रामुळे त्यामुळे शासकीय सेवेतील विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे. दुर्दैवाने तसे काही घडल्यास असंतुष्ट किंवा नाराज कर्मचारीही विद्यापीठाविरोधात टोकाची भूमिका घेण्याची शक्यता असून, त्यामुळे विद्यापीठात कमालीची अशांतता निर्माण होऊ शकते. तसेही सध्या विद्यापीठात राजकीय पक्षांच्या कामगार संघटना शिरकाव करण्याच्या तयारीत असल्याने अतिमहत्त्वाकांक्षी तक्रारकर्त्या कर्मचाऱ्यांना यामुळे चांगलाच धडा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विद्यापीठ ग्लोबल पातळीवर नेण्याचे वारंवार सांगितले जाते, मात्र विद्यापीठाला अजूनही अंतर्गत वाळवीवर मात्रा शोधता आलेली नाही. अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील रस्सीखेच, तू तू मै मै, तसेच वर्चस्ववादाच्या स्पर्धेमुळे विद्यापीठातील अंतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच कुलसचिवांच्या जवळ जाण्याची नेहमीची स्पर्धाही कर्मचाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण करणारी ठरली आहे. ही परिस्थिती केवळ आताच नाही तर कुलसचिवांजवळील व्यक्ती सर्वांत सुरक्षित मानली जात असल्यामुळे असे कोंडाळे कुलसचिवांभोवती कायम असते. यातून सकारात्मक परिणाम दिसण्याऐवजी भेदभावाचे प्रकार घडत असल्याचा अनुभव आजवर विद्यापीठाने घेतला आहे. आजची परिस्थितीही त्यापेक्षा वेगळी नाही.