अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १४० धावांनी दणदणीत विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने आपल्या भेदक गोलंदाजीने महत्त्वाचे योगदान दिले. दरम्यान, मोहम्मद सिराजने द इंडियन एक्सप्रेसच्या द आयडिया एक्स्चेंजमध्ये धोनीकडून शिकलेला एक महत्त्वाचा धडा सांगितला.
द इंडियन एक्सप्रेसच्या द आयडिया एक्स्चेंजमध्ये सिराजला आयपीएलमध्ये त्याच्या खराब कामगिरीनंतर अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. या अनुभवांबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की, 'ट्रोलिंग' आणि टीकाकारांच्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करण्याची कला त्याला टीम इंडियात सामील झाल्यानंतर धोनीकडून शिकायला मिळाली. "कोणी काहीही बोलू दे, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता, तेव्हा संपूर्ण जग तुमच्या पाठीशी उभे राहते, पण जेव्हा तुम्ही खराब खेळता, तेव्हा हेच जग तुझ्यावर टीका करते", असे धोनीने मला सांगितले होते", असे सिराज म्हणाला. मोहम्मद सिराज सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा एक महत्त्वाचा वेगवान गोलंदाज बनला आहे आणि सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
मोहम्मद सिराजने संपूर्ण सामन्यात वेस्ट इंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडले आणि भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा कणा असल्याचे पुन्हा सिद्ध केले. मोहम्मद सिराजने संपूर्ण सामन्यात एकूण ७ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजने ४० धावांत ४ विकेट्स घेत त्यांच्या टॉप ऑर्डरला पूर्णपणे नामोहरम केले. त्याच्या आक्रमक माऱ्यामुळे वेस्ट इंडीजचा संघ अवघ्या १६२ धावांवर गारद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावातही सिराजची कामगिरी उत्कृष्ट राहिली. त्याने आणखी ३ विकेट्स घेतल्या.
सिराजचा नवा विक्रम, मिचेल स्टार्कला टाकले मागे
मोहम्मद सिराजने या कामगिरीसह एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आघाडीवर आला. सिराजने आपल्या मागील १२ कसोटी डावांमध्ये ३० विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला (मागील १४ डावांत २९ विकेट्स) मागे टाकले आहे. सिराजच्या या सातत्यपूर्ण आणि घातक गोलंदाजीमुळेच भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीच वेस्ट इंडीजवर मोठा विजय मिळवला. रवींद्र जडेजाच्या (१०४ नाबाद, ७ विकेट्स) अष्टपैलू कामगिरीसह सिराजच्या वेगवान गोलंदाजीची या विजयात प्रमुख भूमिका राहिली.