विरोधाला न जुमानता घोटी बाजार समितीने स्थलांतर
By Admin | Updated: May 9, 2015 23:14 IST2015-05-09T23:02:03+5:302015-05-09T23:14:23+5:30
प्रवेशद्वार मातीचा ढिगारा : नागरिकांचा रस्ता बंद

विरोधाला न जुमानता घोटी बाजार समितीने स्थलांतर
घोटी : सलग दोन वेळा विकासकामांसाठी घोटीतील बाजार समिती पर्यायी जागेत स्थलांतर करण्याचा घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रयत्न शेतकरी व व्यापारी यांनी प्रखर विरोध केल्यानंतरही विरोधाला न जुमानता समितीच्या दोन्ही प्रवेशद्वारातच मातीचा ढिगारा टाकून रस्ता बंद केल्याने शेतकऱ्यांना नाइलाजास्तव लादलेल्या ठिकाणी शेतमाल न्यावा लागला.
नवीन ठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने रखरखत्या उन्हात शेतमाल विक्र ीसाठी ठेवावा लागला. दोन्ही प्रवेशद्वार रात्रीच बंद केल्याने या प्रवेशद्वारातून वर्दळ असणाऱ्या नागरिकांचे दिवसभरात मोठे हाल झाले. समितीच्या आवाराचे सिमेंट कॉँक्रीटीकरणाच्या कामासाठी भाजीपाला खरेदी - विक्रीचा बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला होता. स्थलांतरित नवीन जागेवर शेतकरी व व्यापारी याना कोणत्याही सोयीसुविधा न देता बाजार स्थलांतराचा प्रयत्न होता. मात्र हा प्रयत्न शेतकरी व व्यापारी या उधळून लावत या नवीन जागेत स्थलांतर करण्यास विरोध केला होता.
दोन वेळा स्थलांतराचा प्रयत्न करूनही यश येत नसल्याने अखेर बाजार समितीने स्थलांतर करण्याची भूमिका घेत दोन्ही प्रवेशद्वार मातीचे ढिगारे टाकून बंद केले. शनिवारी सकाळी शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची वाहने यामुळे अडली गेल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत शेतमाल नाइलाजास्तव पर्यायी जागेत विक्रीसाठी नेला. तसेच ही दोन्ही प्रवेशद्वार बंद झाल्याने लगतच्या इंदिरानगर वसाहतीतील नागरिकांचा रहदारीचा रस्ता बंद झाल्याने मोठे हाल झाले. हा माल उन्हाने कोमजून गेल्याने भाव कोसळले. आवाराच्या सिमेंट कॉँक्रीटीकरणाच्या कामासाठी पणन मंडळाकडून निधी उपलब्ध झाला असून, हे काम करण्याचे कंत्राट एका ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र हे काम रखडल्याने हा निधी परत जाईल व ठेकेदाराचे आर्थिक नुकसान होईल या भीतीने बाजार स्थलांतर करण्याचा निर्णय ठेकेदाराच्या सूचनेनुसार घेण्यात आला. मात्र शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असतानाही समितीने घाईगर्दीने स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.