वडाळीभोईनजीक अपघातात पोलीस उपअधीक्षक ससाणे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:13 IST2020-06-11T19:13:57+5:302020-06-11T19:13:57+5:30
पोलीस उपअधीक्षक ससाणे दोन दिवस सुटीच्या निमित्ताने नाशिकला परतत होते. त्याचवेळी चांदवड सोडून सोग्रस फाटा पार करून त्यांचे वाहन वडाळीभोईच्या नजीक आले होते.

वडाळीभोईनजीक अपघातात पोलीस उपअधीक्षक ससाणे ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : चांदवड तालुक्यातील वडाळीभोईनजीक झालेल्या कार अपघातात अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली. नाशिक येथील आपल्या घरी त्यांच्या चारचाकी वाहनाने परतत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात कोसळून काळाने ससाणे यांच्यावर घाला घातला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच नाशिकरोडला शोककळा पसरली.
पोलीस उपअधीक्षक ससाणे दोन दिवस सुटीच्या निमित्ताने नाशिकला परतत होते. त्याचवेळी चांदवड सोडून सोग्रस फाटा पार करून त्यांचे वाहन वडाळीभोईच्या नजीक आले होते. अचानक त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उलटली. वाहनाचा वेग अधिक असल्यामुळे गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. त्यात ससाणे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात स्थळावरून ओळखीच्या व्यक्तीकडून याबाबतची माहिती माने गोक्षेत्र प्रतिष्ठानचे चेतन शाह यांना समजताच त्यांनी पोलिसांनी याची माहिती दिली. ससाणे यांच्या अपघाती मृत्युमुळे जळगाव ग्रामीण पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस उपअधीक्षक ससाणे हे नाशिकरोडच्या गायखे कॉलनीतील साई आनंद सोसायटीत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बहिणी असा परिवार आहे. पोलीस खात्यात अत्यंत सालस स्वभावाचे म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्ती केली जात आहे.