टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:59 IST2019-06-15T22:52:37+5:302019-06-16T00:59:04+5:30
जेलरोड नारायणबापूनगर येथे वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविणाऱ्या व जेलरोड भागात भाईगिरी, टवाळखोरी करणाºया गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना निवेदन देताना नगरसेवक प्रशांत दिवे, राहुल दिवे, दिनकर आढाव, मंगला आढाव, रोशन आढाव, गणेश जाधव, देवीदास पगार, मिलिंद शिरसाठ, अक्षय आहिरे.
नाशिकरोड : जेलरोड नारायणबापूनगर येथे वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविणाऱ्या व जेलरोड भागात भाईगिरी, टवाळखोरी करणाºया गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जेलरोड नारायणबापूनगर येथे शनिवारी मध्यरात्री टवाळखोर मद्यपी युवकांनी दगडफेक करून तीन चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच दुचाकीचीदेखील मोडतोड करून नारायणबापूनगर चौकातील पोलीस चौकीवर दगडफेक केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. जेलरोड भागात युवती, महिलांची छेडछाड, सार्वजनिक ठिकाणी, मनपा शाळा, उद्यान या ठिकाणी सायंकाळनंतर मद्यपींच्या गोंधळामुळे रहिवासी व विशेष करून महिलावर्ग त्रस्त झाला आहे. याबाबत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची नगरसेवक प्रशांत दिवे, मंगला आढाव, दिनकर आढाव, राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी भेट घेऊन वाढती टवाळखोरी, गुंडगिरी याबाबत चर्चा करून निवेदन दिले. जेलरोड भागात व्यापारी व रस्त्यावरील विक्रेते यांना धमकाविणे, हप्ते गोळा करणे, युवती, महिलांची छेडछाड, पेट्रोल चोरी, वाहनांचे नुकसान, रस्त्यावरील व उद्यानातील पथदीव्यांचे दिवे फोडणे या गोष्टी नित्याच्याच झाल्याने रहिवासी दहशतीच्या वातावरणात जगत आहे. रात्रीच्या वेळी टवाळखोर दारू पिऊन उपद्रव करीत आहे. पोलिसांनी जेलरोड भागात दिवस-रात्र गस्त वाढवून टवाळखोरी व भाईगिरी करणाऱ्यांची दहशत मोडून काढावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक प्रशांत दिवे, मंगला आढाव, दिनकर आढाव, राहुल दिवे, रोशन आढाव, गणेश गडाख, किरण जाधव, अॅड. प्रसाद नागवंशी, वृषाली भोळे, कमल सरमाडे, अनिता गिरी, सुनीता पाटील, देवीदास पगार, गणेश जाधव, मिलिंद शिरसाठ, अक्षय आहिरे आदींच्या सह्या आहेत.