पंचवटी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:09 IST2020-08-07T23:36:10+5:302020-08-08T01:09:43+5:30
मुंबईत दररोज नोकरी, व्यवसायासाठी ये-जा करणाऱ्यांसाठी पंचवटी एक्स्प्रेस नाशिककरांची लाइफलाइन आहे. पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी पंचवटी रेल्वे प्रवासी संघाने केली आहे.

पंचवटी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी
नाशिकरोड : मुंबईत दररोज नोकरी, व्यवसायासाठी ये-जा करणाऱ्यांसाठी पंचवटी एक्स्प्रेस नाशिककरांची लाइफलाइन आहे. पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी पंचवटी रेल्वे प्रवासी संघाने केली आहे.
खासदार हेमंत गोडसे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, अनेक वर्षांपासून नाशिकचे हजारो प्रवासी पंचवटी, गोदावरी, राज्यराणीने मुंबईला दररोज अपडाऊन करतात. मात्र कोरोना फैलाव रोखण्यासाठी सरकारने रेल्वेगाड्या चार महिन्यांपासून बंद ठेवल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. एसटीही बंद आहे. त्यामुळे मुंबईला जाता येत नसल्याने सरकारी व खासगी नोकरदारांच्या नोकºया धोक्यात आल्या आहेत. अनेकांना केवळ जाण्या-येण्याची सोय नसल्यामुळे सुट्टी घेऊन घरी बसावे लागत आहे. नोकरी टिकविण्यासाठी अनेक जण रोज खासगी वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे दिवसाला प्रत्येकी तीन हजारांवर खर्च येत आहे. हा खर्च सर्वसामान्याना परवडण्यासारखा नाही. हातात पगार शिल्लक राहत नाही.
काही नोकरदार जीव धोक्यात घालून नाशिक-मुंबई-नाशिक असा दररोज प्रवास करत आहेत. हे लक्षात घेऊन पंचवटी, राज्यराणी, गोदावरी या गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब केदारे, दीपक भदाणे आदींच्या सह्या आहेत. गोडसे यांनी याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.