रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:42 IST2021-03-04T22:18:17+5:302021-03-05T00:42:19+5:30
डांगसौदाणे : परिसरातील शाळा व महाविद्यालयाच्या आवारात व ये-जा करणाऱ्या रस्त्यावर रोडरोमिओंचा वावर वाढला असून पोलीस प्रशासनाकडून या रोडरोमिओंचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी
डांगसौदाणे : परिसरातील शाळा व महाविद्यालयाच्या आवारात व ये-जा करणाऱ्या रस्त्यावर रोडरोमिओंचा वावर वाढला असून पोलीस प्रशासनाकडून या रोडरोमिओंचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
डांगसौंदाणे परिसरातील जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच सप्तशृंगी कला व वाणिज्य महाविद्यालयात अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. कोरोनामुळे शाळा व कॉलेज बंद होते. मात्र, गेल्या महिन्यात शाळा व महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
या महाविद्यालयात आजूबाजूच्या सात-आठ खेड्यांवरून विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. शाळा व कॉलेज सुरू होण्याच्या वेळेस व सायंकाळी सुटल्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात व वर्दळीच्या रस्त्यावर सध्या रोडरोमिओंनी उच्छाद मांडला आहे. शाळा व महाविद्यालय सुरू होण्याच्या वेळेस रस्त्यावरून जात असलेल्या तरुणींची छेड काढणे, त्यांना अर्वाच्च भाषेत बोलणे, मोटारसायकलवरून भरधाव येऊन कट मारणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींत दहशतीचे वातावरण आहे.
पालकवर्गानेही पालक मेळाव्यात याबाबत शिक्षकांजवळ वारंवार तक्रारी केल्या. पोलीस प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना योग्य ते शासन करावे व त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा सोनवणे यांनी केली आहे.