समृद्धी महामार्गासाठी भोजापूर धरणातील गाळ काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 18:45 IST2019-05-14T18:44:12+5:302019-05-14T18:45:09+5:30
सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात वेगाने सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात माती व मुरमाची आवश्यकता असल्याने या कामासाठी भोजापूर धरणातील गाळ काढण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देण्यात आले.

समृद्धी महामार्गासाठी भोजापूर धरणातील गाळ काढण्याची मागणी
भोजापूर धरणाची १९७२ निर्मिती करण्यात आली असून, ४७ वर्षांपासून एकदाही गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमताही निम्म्यावर आली आहे. भोजापूर धरण सिन्नर व संगमनेर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या उपजिविकेसाठी वरदान ठरत आलेले आहे. परंतु, नजिकच्या काळात वाढती लोकसंख्या, वाढते पाणीपुरवठा प्रकल्प व शेतीसाठी पाण्याची वाढती मागणी यामुळे धरणातील पाणीसाठा अपुरा पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना तीव्र दुष्काळास सामोरे जावे लागत आहे. या धरणातील गाळ काढल्यास धरणातील साठवण क्षमतेत वाढ होणार आहे. जास्त पाणीसाठ्यामुळे परिसरातील शेतक-यांना लाभ होणार असून, दुष्काळावर मात करणे शक्य होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे, शहराध्यक्ष निखिल लहामगे, धनंजय बोडके, सतीश आव्हाड, राम आव्हाड, अंबादास आव्हाड, ऋषिकेश औटी, गोरख जाधव, भगिरथ जाधव आदींच्या स्वाक्ष-या आहेत.