पाथर्डी फाट्यावरील अवैध हुक्का पार्लर बंदची मागणी
By Admin | Updated: October 17, 2015 22:07 IST2015-10-17T22:02:05+5:302015-10-17T22:07:03+5:30
पाथर्डी फाट्यावरील अवैध हुक्का पार्लर बंदची मागणी

पाथर्डी फाट्यावरील अवैध हुक्का पार्लर बंदची मागणी
इंदिरानगर : पाथर्डी फाट्यावरील एका हॉटेलमध्ये अवैधरीत्या सुरू असलेले हुक्का पार्लर बंद करण्याची मागणी छावा मराठा युवा संघटनेने केली असून, या मागणीचे निवेदन इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस़ वऱ्हाडे यांना दिले आहे़ दरम्यान, निवेदनानंतरही हुक्का पार्लर सुरूच असल्याने परिसरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे़
पाथर्डी फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये अनेक दिवसांपासून अवैधरीत्या हुक्का पार्लर सुरू आहे़ या हॉटेलमध्ये दिवसा, तसेच रात्रीदेखील महाविद्यालयीन युवक-युवती मोठ्या संख्येने येत असून, त्यांच्या गोंधळामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ या व्यसनामुळे युवा पिढीचे भविष्य खराब होण्याची भीती लक्षात घेऊन छावा संघटनेने हे हुक्का पार्लर बंद करण्याची मागणी केली आहे़
या मागणीचे निवेदन इंदिरानगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, या निवेदनावर आशिष हिरे, शरद शिंदे, विजय उगले, नितीन दातीर, सूरज चव्हाण, अक्षय भांड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ दरम्यान, निवेदन देऊन पाच दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जातो आहे़ (वार्ताहर)