देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी
By Admin | Updated: August 30, 2015 22:40 IST2015-08-30T22:39:33+5:302015-08-30T22:40:28+5:30
देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी
खामखेडा : देवळा तालुक्यात चालू वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खामखेडा परिसरात जनावरांचा चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देवळा तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी खामखेडा परिसरातील नागरिकांनी केली आहे.
खामखेडा परिसरात आतापर्यंत अगदी अल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. आॅगस्ट महिना संपला तरी शेतीउपयोगी पाऊस नाही. नदी-नाले, विहिरी, कूपनलिका, छोटे-मोठे बंधारे कोरडे पडले आहेत. श्रावण महिन्यामध्ये गिरणा दुथडी भरून वाहत असे. नदी पार करण्यास कोणीही हिंमत करत नसे. श्रावण महिना अर्धा होत आला तरी अजूनही नदीला पाणी नाही. नदीचे पात्र कोरडे ठणठणीत असून, भकास दिसत आहे. आता गिरणा नदीच्या काठावरील पाणीपुरवठा असणाऱ्या गावांना टंचाई जाणवू लागली आहे. मुबलक पाणी असणाऱ्या गावांनाही पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
नदी-नाले कोरडे असल्याने विहिरींना पाणी नाही. त्यामुळे जनावरांना खायला चारा नाही व शिवारात विहिरींना पाणी नसल्याने चाऱ्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने, त्यामुळे आपले किमती पशुधन सांभाळणे मोठे अवघड झाले आहे. दररोज हवामानात बदल झाला की बळीराजाच्या नजरा अकाशाकडे जातात. पावसासाठी दररोज देवाला साकडे घातले जाते. ‘धोंड्या धोंड्या पाणी दे’चा गजर गावामध्ये रात्रीच्या वेळेस ऐकावयास मिळत आहे. जुन्या वयोवृद्ध माणसांच्या अनुभवातून १९७२ च्या दुष्काळापेक्षा हा दुष्काळ
भयानक आहे. १९७२ च्या दुष्काळात पिण्यासाठी पाणी होते, फक्त खाण्यासाठी अन्न नव्हते. यावेळेस खायला अन्न आहे परंतु जनावरांसाठी चारा व पिण्यासाठी पाण्याचा दुष्काळ आहे. तेव्हा शासनाने तालुका
टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी खामखेडा परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)