दीपकचा जामीन नामंजूर : एचएएलच्या विमानांची माहिती 'आयएसआय'ला पुरविल्याचा ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 19:31 IST2020-12-05T19:25:02+5:302020-12-05T19:31:39+5:30
देशाच्या सुरक्षाव्यवस्थेकरिता व संरक्षण खात्याच्या एचएएलसारख्या कारखान्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही बाब अत्यंत घातक ठरणारी असल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर न्यायालयात म्हणाले.

दीपकचा जामीन नामंजूर : एचएएलच्या विमानांची माहिती 'आयएसआय'ला पुरविल्याचा ठपका
नाशिक : भारतीय बनावटीच्या विमानांची गोपनीय माहिती थेट पाकिस्तानच्या 'आयएसआय' या गुप्तचर संस्थेला पुरविल्याच्या आरोपाखाली राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात अटक केलेल्या एचएएल कर्मचारी दीपक शिरसाठ याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी (दि.५) नामंजूर केला.
व्हॉट्सअपद्वारे एका अनोळखी महिलेसोबत ओळख झाली आणि या ओळखीतून पुढे तिच्या मोहक अन् भावुक बोलण्याकडे आकर्षित होत गेलेला दीपक हा कधी पाकिस्तानच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकला हे त्यालाही कळले नाही. त्यानंतर त्या अनोळखी महिलेच्या सांगण्यावरुन याने थेट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) येथील प्रतिबंधीत क्षेत्राची व तेथे तयार केले जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या लढाऊ सुखोई विमानांची तसेच त्यांच्या अन्य संवेदनशील भागाची व इतर सुरक्षा संबंधीत गोपनीय माहिती सोशल मीडियावरुन महिलेला पुरविल्याची धक्कादायक बाब एटीएसच्या पथकाने दोन महिन्यांपुर्वी उघडकीस आणली होती. दीपकला बेड्या ठोकल्यानंतर त्यास न्यायालयाने सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावली होती. त्यात दीपकने पाकस्थित काही व्यक्ती ज्या अन्य देशांमध्ये आहे, त्यांना माहिती पुरविल्याचे तपासात समोर आले आहे, यामुळे दीपकची रवानगी कारागृहात करण्यात आली.
दरम्यान, दीपकने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यात सरकारी पक्षातर्फे दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायालयात दीपकने पाकस्थित लोकांना संवेदनशील माहिती पुरवल्याबाबत न्यायालयात पुरावे सादर केले. त्यात दीपकने पाकिस्तानला पुरवलेली माहिती मिळवणे अतिशय अवघड असतानाही ती माहिती मिळवून पाकिस्तानला पाठवली. त्यामुळे देशाच्या सुरक्षाव्यवस्थेकरिता व संरक्षण खात्याच्या एचएएलसारख्या कारखान्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही बाब अत्यंत घातक ठरणारी असल्याचे मिसर न्यायालयात म्हणाले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत दीपक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.