Decision reserved in respect of Chumble in the Market Committee case | बाजार समिती प्रकरणातील चुंभळे यांच्या संदर्भात निर्णय राखीव
बाजार समिती प्रकरणातील चुंभळे यांच्या संदर्भात निर्णय राखीव

नाशिक : बाजार समितीत नोकरी लावण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच घेणारे सभापती शिवाजी चुंभळे यांचे बाजार समितीतील अधिकार गोठविण्याच्या जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयावर दाखल झालेल्या अपिलाची शुक्रवारी सुनावणी होऊन दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या युक्तिवादानंतर जिल्हा निबंधकांनी त्यावरील आपला निर्णय राखून ठेवला आहे.
आॅगस्ट महिन्यात शिवाजी चुंभळे यांनी बाजार समितीतील कंत्राटी कर्मचाऱ्यास कायम करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेतल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले होते.
चुंभळे यांच्याकडून बाजार समितीच्या कामकाजात हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्याने त्यांचे आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार काढून घेण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समिती सचिवांना दिले होते. परंतु तरीही चुंभळे हे बाजार समितीच्या सभेस उपस्थित राहिले व त्यांनी जिल्हा उपनिबंधकांना अधिकार कमी करण्याचे अधिकार नसल्याचा दावा करून चुंभळे यांनी अपील दाखल केले होते. या अपिलावर शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली.
सोमवारीच लागणार निकाल
चुंभळे यांनी वकिलामार्फत आपली बाजू मांडली, तर बाजार समितीच्या वतीनेही बाजू मांडण्यात आली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही सुनावणी सुरूच होती. जिल्हा उपनिबंधक काय निर्णय देतात याकडे बाजार समितीच्या संचालकांचे लक्ष लागून राहिलेले असताना सुनावणीचे काम करून जिल्हा उपनिबंधकांनी आपला निर्णय राखून ठेवला व कार्यालय सोडले. शनिवार, रविवारी शासकीय सुटी असून, आता सोमवारीच या संदर्भातील निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Web Title:  Decision reserved in respect of Chumble in the Market Committee case
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.