पंचवटीत १४ महिन्यांच्या बालिकेचा खून; आई जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 17:04 IST2019-07-16T17:03:13+5:302019-07-16T17:04:02+5:30
पॅराडाईज सोसायटीमधील एका सदनिकेत पवार कुटुंब वास्तव्यास आहे. हा परिसर आडगाव पोलीस ठाणे हद्दीत येतो.

पंचवटीत १४ महिन्यांच्या बालिकेचा खून; आई जखमी
नाशिक : शहरातील औरंगाबाद महामार्गावरील साई पॅराडाईज नावाच्या अपार्टमेंटमधील पवार कुटुंबीयांच्या दीड वर्षाच्या बालिकेचा घातपात झाल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, बालिकेची आई योगीता मुकेश पवार यादेखील जखमी असून त्या बेशुध्दावस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. वडील मुकेश पवार हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून नोकरीस आहे. बालिकेच्या गळ्याभोवती धारधार शस्त्राच्या जखमा असल्यावरून बालिकेचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. याबाबत पुढील तपास सुरू असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, पॅराडाईज सोसायटीमधील एका सदनिकेत पवार कुटुंब वास्तव्यास आहे. हा परिसर आडगाव पोलीस ठाणे हद्दीत येतो. स्वरा मुकेश पवार या जेमतेम १४ महिन्यांच्या चिमुकलीचा घातपात झाला. जखमी अवस्थेत चिमुकलीला दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. बालिकेच्या आईवडिलांनी याबाबत कुठलीही माहिती अद्याप पोलिसांना दिलेली नाही. बालिकेच्या गळ्यावर जखमा असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. बालिकेचा मृत्यू झाला असून तिच्या मानेभोवती जखमा आढळून आल्या आहेत; मात्र प्रथमदर्शनी ही घटना संशयास्पद असून पुढील तपास पोलीस करत असल्याचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.