नाशिक : येथील गंधर्वनगरी भागात एका गृहप्रकल्पाच्या ठिकाणी मजुराच्या आठ वर्षीय मुलावर अनैसर्गिकरीत्या अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २०) उघडकीस आली. मृतदेहाचे सोमवारी शवविच्छेदन करण्यात आले असता हा गंभीर प्रकार समोर आला. संशयितांच्या मागावर पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
नाशिक शहरातील उपनगरजवळच्या एलआयसी रस्त्यावर असलेल्या गंधर्वनगरीमध्ये सहा मजली मुकुंद को-ऑप. हाउसिंग सोसायटीची इमारत निर्माणधीन आहे. तसेच इमारतीत पाच मजुरांची कुटुंबेदेखील वास्तव्यास आहेत. पहिल्या मजल्यावर मजूर सुरेश किसन दुधाट हे त्यांची पत्नी, आई व दोन मुलांसह राहतात. त्यांचा धाकटा मुलगा हा विशेष बालक होता. दुधाट कुटुंबीय मूळ परभणी जिल्ह्यातील शेलू तालुक्यातील खेरड या गावचे आहे. दरम्यान, त्यांच्या हा मुलगा रविवारी सायंकाळी अचानकपणे तेथून बेपत्ता झाला होता. त्याची श्रवणशक्ती कमकुवत होती व बोलताही येत नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही. रात्रीच्या सुमारास या सहा मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका ‘डक’मध्ये तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला बाहेर काढून त्याच्या वडीलांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान, सोमवारी याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
शवविच्छेदनातून झाला खुनाचा उलगडा
सुरुवातीला उंचावरून पडल्याने मुलगा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्याच्या हातापायांना दुखापतदेखील झालेली होती; मात्र मृतदेहाचे साेमवारी शासकीय जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला. तसेच त्याच्यावर अनैसर्गिकरीत्या अत्याचार झाल्याचे व पाठीच्या बरगड्या तुटल्याने त्याचा मृत्यू झाल्याचीही गंभीर बाब समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.