नाशिक : नांदगाव, चांदवड, देवळा आणि कळवण तालुक्यात अद्याप समाधानकारक पावसाची नोंद नसली तरी जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा मात्र ९१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. तब्बल १२ धरणांमध्ये पाणीसाठा १०० टक्के झाला आहे तर ९ धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गतवर्षाच्या तुलनेत धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने काही तालुके वगळता सिंचनासह पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.जिल्ह्यात जुलै-आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाने वार्षिक सरासरी कधीच ओलांडली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १०१३ मि.मी. इतकी असून आतापावेतो १२५० मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यातील नांदगाव, चांदवड, देवळा आणि चांदवड तालुक्यात मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या तालुक्यात ५० ते ६५ टक्क्यांच्या आसपासच पावसाची नोंद झालेली आहे. त्यातही येवला, चांदवड तालुक्यात काही गावांमध्ये अजूनही टॅँकरची मागणी होत आहे. एकीकडे चार-पाच तालुक्यांमध्ये पावसाने वक्रदृष्टी केली असतानाच जिल्ह्यातील लघु व मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झालेली आहे. धरणांमध्ये तब्बल ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी ४ सप्टेंबर रोजी धरणांतील पाणीसाठा ७९ टक्के होता. यंदा मात्र पावसाने उच्चांक मोडले आणि तब्बल १२ धरणांतील पाणीसाठा १०० टक्के झाला आहे तर काही धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. त्यामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शंभर टक्के भरलेल्या धरणांमध्ये गंगापूर, काश्यपी, आळंदी, करंजवण, वाघाड, तिसगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारी, केळझर यांचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ९१ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:13 IST
नऊ धरणांतून विसर्ग : बारा धरणे शंभर टक्के भरली
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ९१ टक्के पाणीसाठा
ठळक मुद्देजिल्ह्यात जुलै-आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाने वार्षिक सरासरी कधीच ओलांडली आहे.