पळसण, उंबरठाणला आंबा पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:18 IST2021-01-07T23:33:13+5:302021-01-08T01:18:40+5:30
सुरगाणासह पळसण, भदर, उंबरठाण परिसरात गुरुवारी (दि.७) सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली.

पळसण खळ्यात मळणीकरिता रचून ठेवलेली भाताची उडवी अवकाळी पावसामुळे भिजली आहे.
सुरगाणा : सुरगाणासह पळसण, भदर, उंबरठाण परिसरात गुरुवारी (दि.७) सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे तसेच सततच्या ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील हापूस, राजापुरी,तोतापुरी या जातीच्या आंब्याचा मोहर झडल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
घाटमाथा परिसरात स्ट्राबेरीचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले तसेच मळणीकरिता खळ्यात रचून ठेवलेली भाताची उडवी झाकण्याकरिता एकच धावपळ उडाली तर उडवी पावसाने भिजल्याने तांदूळ खराब होणार असून भाताचे तनस(चारा) भिजला आहे. तालुक्यातील पळसण परिसरात अवकाळी पावसामुळे शेतातून खळ्यात गोळा करुन ठेवलेल्या
भात, तूर, उडीद पिकांचे नुकसान झाले आहे.