रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मुंबईकडे ‘लाँगमार्च’, शासनाच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 17:30 IST2023-06-13T17:30:17+5:302023-06-13T17:30:46+5:30
राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहाचे रिक्त पदे रोजंदारी ऐवजी बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मुंबईकडे ‘लाँगमार्च’, शासनाच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी
नाशिक: आदिवासी विभागातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहांमध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने हा निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीसाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. १३) मंत्रालयावर लॉंगमार्च काढला. या माेर्चाला परवानगी नसतानाही गमिनी काव्याने नाशिकमध्ये ५०० पेक्षा अधिक आंदोलक जमले आणि त्यांनी मुंबईकडे मोर्चा वळविला.
राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहाचे रिक्त पदे रोजंदारी ऐवजी बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारची भरती परस्पर करण्यात आली तर त्यांचे वेतन संबंधित मुख्याध्यापक, अधिक्षकानाच दयावे लागेल असे देखील पत्रक काढण्यात आल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांनी या विरोधात आवाज उठविला आहे.
संबंधित निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभाग वर्ग ३ व ४ रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.१३) नाशिकमधून लाँगमार्च काढला. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आंदोलकांच्यावतीने सांगण्यात आले.