डोंगर चढत-उतरत करावी लागतात दैनंदिन कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 00:51 IST2021-01-22T20:15:32+5:302021-01-23T00:51:34+5:30
त्र्यंबकेश्वर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात व त्र्यंबकेश्वरच्या सह्याद्रीच्या पर्वत रांगातील मेटघर किल्ला येथील आदिवासी बांधव रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचितच आहेत. मेटघरला जायला अजून पक्का रस्ता नसल्याने दररोज डोंगर चढून-उतरून ग्रामस्थांना दैनंदिन कामे करावी लागत आहेत.

डोंगर चढत-उतरत करावी लागतात दैनंदिन कामे
येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दूषित पाण्यावर आदिवासी बांधव आपली तहान भागवत आहे. दूषित पाण्याने वेळप्रसंगी गंभीर आजारांचा त्यांना सामना करावा लागतो. या सर्व गंभीर समस्या पाहता त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे व संपत चहाळे यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगास या समस्यांसंदर्भात निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन अनुसूचित जाती-जमाती आयोगाने महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाला याठिकाणी सुविधा देण्यासाठी तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर आदिवासी विभागाचे निरीक्षक एस.एन. सैंदाणे यांनी त्र्यंबकेश्वरला येथे येऊन महादरवाजा मेटेला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी आदिवासी महिला व नागरिकांनी पाणीप्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न सुटावा, अशी एकमुखी मागणी केली. यावेळी सैंदाणे यांच्याशी सोनवणे व चहाळे यांनी आदिवासी महिलांच्या मागणीकडे लक्ष वेधले. यावेळी महादरवाजा मेटच नव्हे तर मेटघर किल्ला ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वाड्या पाडे यांना रस्ते व पाण्याची सोय होणे गरजेचे असल्याची मागणी केली.
आमदार हिरामण खोसकर यांनी पिण्याच्या पाण्यासाठी पाच लाख व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशनमध्ये मेटघर ग्रामपंचायतीचा समावेश केला. विहीर, पंप, पाइप यासाठी पाच लाख अशा दहा लाखात मेटघर किल्ल्याचा पाणीप्रश्न सहज सुटू शकेल. विहीर बांधण्यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. भिलमाळ येथे विहीर बांधून त्यावर जास्त पॉवरचे मशीन बसवून नळपाणीपुरवठा योजना साकार होईल. यावेळी सैंदाणे यांच्यासह सर्वांनी विहिरीच्या जागेची पाहणी केली. याप्रसंगी उमेश सोनवणे संपत चहाळे, उपसरपंच दत्तू झोले, ग्रामसेवक विलास पवार, मोतीराम झोले आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.