स्थायी समितीत गाजली साधुग्राममधील ‘डबापरेड’

By Admin | Updated: August 7, 2015 00:53 IST2015-08-07T00:52:25+5:302015-08-07T00:53:49+5:30

आरोग्याविषयी चिंता : ठेकेदारांवर आरोपांच्या फैरी आणि तंबीही; प्रसंगी कारवाईचा इशारा

Dabaprad in Sagittarius | स्थायी समितीत गाजली साधुग्राममधील ‘डबापरेड’

स्थायी समितीत गाजली साधुग्राममधील ‘डबापरेड’

नाशिक : तपोवनातील साधुग्राममध्ये स्वच्छतेसाठी ठेकेदारामार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांकडूनच उघड्यावर नैसर्गिक विधी उरकत चाललेल्या ‘डबापरेड’प्रकरणी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत नाशिककरांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली. संबंधित ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करणे आवश्यक असताना सुमारे दीड हजार कर्मचारी उघड्यावर राहून अस्वच्छता करत असल्याबद्दल ठेकेदारावरच कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. यावेळी आरोग्याधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांना याप्रकरणी तंबी दिली असून, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचा खुलासा केला. सदर प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल सदस्यांनी ‘लोकमत’लाही धन्यवाद दिले.
दि. ५ आॅगस्ट रोजी लोकमतने ‘स्वच्छता कर्मचाऱ्यांची उघड्यावर डबापरेड’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. स्थायी समितीच्या बैठकीत या वृत्ताचे कात्रण झळकवित रत्नमाला राणे, मेघा साळवे, सुरेखा भोसले यांनी अस्वच्छतेप्रकरणी नाशिककरांच्या आरोग्याविषयीच चिंता व्यक्त केली. रत्नमाला राणे यांनी संबंधित ठेकेदाराकडून अन्य प्रांतांकडून मनुष्यबळ मागविण्यात आले आहे. या कामासाठी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय दिला असता तर अशी वेळच येऊन ठेपली नसती. संबंधित ठेकेदारांना चार-चार ठेके देण्यामागे प्रशासनाच्या प्रेमाबद्दलही राणे यांनी संशय व्यक्त केला. सुरेखा भोसले यांनी संबंधित ठेकेदाराने निविदा अटीनुसार कर्मचाऱ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे काय, असा सवाल उपस्थित केला शिवाय आरोग्य विभागाला केवळ टेंडर काढण्यातच रस असल्याचा आरोपही केला, तर प्रा. कुणाल वाघ यांनी निवास व भोजनाची व्यवस्थाच केली नसल्याने सदर कर्मचारी साधुग्राममधीलच विविध आश्रमांमध्ये अन्नछत्राचा लाभ घेत असल्याचे स्पष्ट केले. राहुल दिवे यांनी अन्य प्रांतांतील मनुष्यबळ घेतल्याने ही सारी समस्या उद्भवल्याचे सांगितले. सभापती शिवाजी चुंभळे यांनीही सदर प्रकार अतिशय गंभीर असल्याचे सांगत संबंधित कर्मचारी स्वच्छतेसाठी आणले की घाण करण्यासाठी? असा प्रश्न केला. सदर कर्मचाऱ्यांना साधुग्राममधील शौचालयांचा वापर करण्यास सांगण्याची सूचनाही सभापतींनी केली. शेवटी अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी या प्रकाराची दखल घेण्यात आली असून, सदर ठेकेदारांना तंबी दिली असल्याचे सांगितले. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास कारवाईही केली जाणार आहे. सफाई कामगारांच्या कामाच्या वेळी ठेकेदारानेच त्यांच्या गरजांविषयी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Dabaprad in Sagittarius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.