भर थंडीत भाविकांची देवदर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:20 IST2018-12-23T00:20:19+5:302018-12-23T00:20:46+5:30
हिवाळ्याच्या कालावधीतील राज्यातील सर्वाधिक कमी तापमान म्हणून नाशिक जिल्ह्याची नोंद झालेली असली तरी नाशिक जिल्ह्यातील पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम आहे.

भर थंडीत भाविकांची देवदर्शनासाठी गर्दी
पंचवटी : हिवाळ्याच्या कालावधीतील राज्यातील सर्वाधिक कमी तापमान म्हणून नाशिक जिल्ह्याची नोंद झालेली असली तरी नाशिक जिल्ह्यातील पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून पंचवटीत रामकुंड, काळाराम मंदिर, तसेच सीतागुंफा, कपालेश्वर महादेव मंदिरात भाविक मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी येत असल्याने कडाक्याच्या थंडीचा भाविकांवर विशेष कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र सध्या पंचवटी परिसरात बघायला मिळत आहे.
हिवाळा सुरू होऊन काही दिवस लोटत नाही तोच कडाक्याची थंडी पसरली आहे. त्यामुळे सायंकाळी सातनंतर बहुतांशी नागरिक घराबाहेर पडताना उबदार कपडे गूंडाळून बाहेर पडत असल्याचे दिसून येते. रात्री पंचवटीतील चौकाचौकात अनेक तरुण मंडळी शेकोटी पेटवून त्याभोवती फेर धरून बसलेले असतात.
कडाक्याची थंडी असतानाही परराज्य, परजिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी दाखल होत असल्याने दुपारी परिसरातील रस्ते भाविकांच्या भाविकांच्या गदीर्ने फुलून जात आहे तर भाविक चारचाकी वाहने आणत असल्याने गंगाघाट परिसरातील वाहनतळ भरगच्च होत असल्याचे दिसून येते.