क्रॉम्प्टन संप 89 दिवस
By Admin | Updated: August 7, 2015 01:09 IST2015-08-07T00:48:24+5:302015-08-07T01:09:52+5:30
क्रॉम्प्टन संप 89 दिवस

क्रॉम्प्टन संप 89 दिवस
सिडको : अंबडच्या क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत सीटू युनियनच्या कामगारांनी पुकारलेल्या संपाला सुमारे तीन महिन्यांचा कलावधी होऊनही संप मिटलेला नाही. आजही संपकरी कामगार हे दररोज कंपनी गेटसमोर उपोषण करीत आहे. येत्या १७ आॅगस्टपर्यंत न्यायालयाने स्थगिती दिल्याने यानंतरच संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे समजते.
अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत सीटू व आयटक अशा दोन युनियन असून, या दोन्ही युनियनपैकी कंपनी व्यवस्थापनाने आयटक या युनियनला मान्यता प्राप्त युनियन म्हणून घोषित केल्याने कंपनीतील पगार वाढ तसेच इतर घडामोडींबाबत कंपनीकडून आयटक युनियनबरोबरच बोलणी होते. परंतु यास सीटू युनियनने आक्षेप घेत आमच्या युनियनमध्ये जास्त सभासद असल्याने कंपनी व्यवस्थापनाने सीटू युनियनलाच अधिकृत मान्यता द्यावी व सर्व करार तसेच पगार वाढीची बोलणीदेखील करावी, असा पावित्रा घेतला. परंतु कंपनी व्यवस्थापनाने मात्र आयटक युनियनच्या पदाधिकाऱ्यांशीच करार केल्याने सीटू युनियन संप सुरू केला. यास आज सुमारे ८९ दिवस म्हणजे तीन महिने होत असतानाही यातून तोडगा निघालेला नाही. या संप काळात संप मिटण्यासाठी अनेक घडामोडीदेखील झाल्या; परंतु कंपनी व्यवस्थापन मात्र आयटक युनियनलाच मान्यता प्राप्त युनियन समजते. याबाबत न्यायालयातही खटला सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी औद्योगिक न्यायाल्याच्या मध्यस्थीने दोन्ही युनियनची सभासद नोंदणी सुरू करण्यात आली होती, परंतु यासही कंपनी व्यवस्थापनाने धुडकावून लावले. आता येत्या १७ आॅगस्टपर्यंत न्यायालयाने स्थगिती दिल्याने यानंतरच या संपाबाबतची पुढील दिशा समजणार असल्याचे समजते. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान, तर होत आहेच; परंतु यात संपकरी कामगारांच्या घरची परिस्थितीदेखील चिंताजनक झाली आहे. (वार्ताहर)