आमदार हिरामण खोसकर यांच्यासह कॉंग्रेसच्या १६पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 16:38 IST2021-05-31T16:37:49+5:302021-05-31T16:38:33+5:30
१६ पदाधिकारी व अन्य २५ कार्यकर्त्यांवर भारतीय दंड विधान कलम १८८प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरिक्षक अशोक पाथरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

आमदार हिरामण खोसकर यांच्यासह कॉंग्रेसच्या १६पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
नाशिक : कोरोनाची साथ सुरु असल्याने साथरोग व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत विविध निर्बंध लागू असून राजकीय, सामाजिक आंदोलनांवर बंदी असतानाही कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी एकत्र येत हातात काळे झेंडे घेऊन एमजीरोडवर आंदोलन केले होते. या आंदोलनाप्रकरणी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र सरकारमध्ये मोदी यांच्या सत्तेला सात वर्षे पुर्ण झाल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या वतीने एम.जी.रोडवर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, प्रवक्ता हेमलता पाटील, माजी मंत्री महिला आघाडीच्या शोभा बच्छाव, सुरेश मारू, राजेंद्र बागुल, रऊफ कोकणी, रमेश पवार, बबलु खैरे, दर्शन पाटील, भारती गीते, राजेंद्र ठाकरे, स्वप्नील पाटील, ज्ञोनेश्वर काळे यांच्यासह एकुण १६ पदाधिकारी व अन्य २५ कार्यकर्त्यांवर भारतीय दंड विधान कलम १८८प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरिक्षक अशोक पाथरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पुढील तपास उपनिरिक्षक कोल्हे हे करीत आहेत.