आरोग्याच्या जनजागृतीसाठी केली संकेतस्थळाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:02 IST2020-06-23T19:00:25+5:302020-06-23T19:02:27+5:30
औंदाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त माहिती देण्यासाठी बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील रहिवाशी व नाशिकच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील चौथीत शिकणाऱ्या आठ वर्षीय आदिश्री पगार या विद्यार्थिनीने संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. त्यासाठी तिने छायाचित्रे व काही निवडक व्हिडिओचा वेबसाईटमध्ये समावेश केला आहे.

आरोग्याच्या जनजागृतीसाठी केली संकेतस्थळाची निर्मिती
दैनंदिन जीवनात चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छतेचे खूप महत्व आहे. प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून स्वच्छतेविषयी पाळावयाचे काही नियम व आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याविषयी वेळेचा सदुपयोग करत आदिश्रीने सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. स्वच्छतेबरोबरच आहार, योगा व व्यायामामुळे होणारे फायदे सोप्या पद्धतीने मांडले आहेत. सामाजिक जबाबदारीचे बोधवाक्यातून प्रबोधन केले आहे. तिच्या वेबसाईटचे नाव http://www.warriorsofhealth.devmamledar.com असे आहे. प्रशासनाला सहकार्य करून प्रत्येकाने स्वत:बरोबरच समाजाची काळजी घेण्याचा संदेश तिने या संकेतस्थळाच्या माध्यमातून दिला आहे. यासाठी तिला तिच्या वडिलांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तिला अभ्यासाबरोबरच अवकाशाविषयी वाचन, कथ्थक, भरतनाट्यम, पियानो वाजवणे, सायकलिंग, विविध सामाजिक विषयांवर भाषण करणे व स्केटिंगची आवड आहे. अल्पवयात पाणी बचत, आॅक्सिजन, वृक्षसंवर्धन, शिक्षण यासह विविध सामाजिक विषय हाताळल्याबद्दल तिच्या या उपक्रमाबद्दल आदिश्रीचे कौतुक होत आहे.