नगरसेवकांना विकासकामांचा धसका
By Admin | Updated: July 28, 2015 01:16 IST2015-07-28T01:16:35+5:302015-07-28T01:16:57+5:30
एलबीटीचा परिणाम : पुन्हा लांबणार फाईलींचा प्रवास

नगरसेवकांना विकासकामांचा धसका
.नाशिक : एलबीटी रद्द करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक धसका नगरसेवकांनी घेतला असून, महापालिकेच्या उत्पन्नात घट झाल्यास विकासकामांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच गेली साडेतीन वर्षे सिंहस्थाच्या नावाखाली प्रभागातील विकासकामे ठप्प झाली आहेत, त्यात आता उत्पन्नाअभावी प्रभागात विकासकामे झाली नाहीत तर दीड वर्षांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जायचे कसे, हा प्रश्न नगरसेवकांना सतावू लागला आहे.
महाराष्ट्र शासनाने ५० कोटींच्या आत उलाढाल असलेल्या व्यापारी-व्यावसायिकांना एलबीटी रद्द करण्यासंबंधी अधिसूचना जारी करतानाच १ आॅगस्टपासून त्याची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू केल्याने महापालिकेच्या उत्पन्नाविषयी चर्चेला उधाण आले आहे. एलबीटी रद्द करण्याच्या निर्णयामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याचा परिणाम विकासकामांवर दिसून येणार आहे. गेल्या साडेतीन वर्षांत सिंहस्थ कामांमुळे महापालिकेला नगरसेवकांच्या प्रभागातील छोट्या-छोट्या विकासकामांकडेही लक्ष देता आलेले नाही. त्याबाबतचा असंतोष नगरसेवकांमध्ये खदखदतो आहेच. मागील आर्थिक वर्षात एक कोटी रुपये नगरसेवक निधी ठेवण्यात आला होता; परंतु महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती लक्षात घेता आयुक्तांनी तो निधी २० लाखांवर आणला होता. त्याचे तीव्र पडसादही उमटले होते. अखेर महासभेने प्रत्येकी ५० लाख रुपयांचा नगरसेवक निधी निश्चित करत त्यातून विकासकामांवर भर देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार ५० लाखांच्या निधीतून काही नगरसेवकांची कामे मार्गी लागली आहेत तर बऱ्याच नगरसेवकांच्या कामांचे कार्यादेश निघणे बाकी आहे. आता एलबीटी रद्द होण्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्यास या ५० लाखांच्या कामांचेही कार्यादेश निघतात की नाही, याचा धसका नगरसेवकांनी घेतला आहे.
स्थायी समितीने महासभेला सादर केलेल्या अंदाजपत्रकात प्रत्येकी ३० लाखांचा निधी निश्चित केला असला तरी त्याचीही पूर्तता होणे अवघड मानले जात आहे. दीड वर्षांवर महापालिकेची निवडणूक येऊन ठेपल्याने प्रभागातील विकासकामांवर भर देण्याची तयारी नगरसेवकांनी चालविली असतानाच एलबीटी रद्द होण्याचे अरिष्ट ओढवल्याने आगामी निवडणुकीला लोकांना कसे सामोरे जायचे, याचा धसकाही नगरसेवकांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)