कोरोनाच्या धसक्याने शाकाहाराला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:29 IST2020-03-20T15:29:04+5:302020-03-20T15:29:17+5:30
कडधान्यांसह पालेभाज्या-फळभाज्यांना मागणी

कोरोनाच्या धसक्याने शाकाहाराला पसंती
खमताणे : कोरोनाचा धसका आता महानगरातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातील लोकांनी घेतला असून, कोरोनाचा विषाणू मांसाहारातून येत असल्याच्या अफवांमुळे शाकाहाराला अधिक पसंती दिली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कडधान्यांसह पालेभाज्या-फळभाज्यांनाही मागणी वाढू लागली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग हा मांसाहारातून होत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचा परिणाम ग्रामीण भागातील पोल्ट्री फार्मसह कत्तलखान्यातील विक्रेत्यांवरही जाणवू लागला आहे. या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय तर पूर्णपणे कोलमडला आहे. कोरोनाच्या धसक्याने लोक आता मांसाहाराऐवजी शाकाहाराला पसंती देत आहेत. त्यामुळे रोजच्या आहारात शाकाहार वाढल्याने भाजीपाला-फळभाज्या यांनाही मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मांसाहार वर्ज्य केला असल्याने कत्तलखान्यांवर होणारी गर्दी कमी होऊ लागली आहे. विक्रेत्यांनी मटन-चिकनचे दर कमी केले असले तरी त्यालाही ग्राहक मिळेनासा झाला आहे. घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी मेन्यूतही मांसाहार जाऊन शाकाहार आला आहे. ग्रामीण भागातील हॉटेल्स, ढाबेसुद्धा ओस पडू लागले आहेत. खवय्ये हॉटेल्स, ढाबे यांच्याकडे पाठ फिरवू लागल्याने हॉटेल व्यवसायही अडचणीत सापडला आहे. या व्यवसायातील रोजगारावरही त्यामुळे गंडांतर आले आहे. सध्या ग्रामीण भागात ओट्यांवर, पारावर, रस्त्यावर, बस स्टॅण्डवर आणि विवाह सोहळ्यांच्या ठिकाणी कोरोनाचीच चर्चा कानी पडत आहे.