The corona information in the district hospital is ringing in the cell | जिल्हा रूग्णालयातील ‘कोरोना’ माहिती कक्षात खणखणतोय दुरध्वनी

जिल्हा रूग्णालयातील ‘कोरोना’ माहिती कक्षात खणखणतोय दुरध्वनी

ठळक मुद्देनाशिकमध्ये कोरोना संक्रमित रुग्ण अद्याप नाही;२५७६१०६ / २५७२०३८ या दोन दुरध्वनी क्रमांकावर संपर्क

नाशिक : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखला जावा, नागरिकांमध्ये निर्माण होणारा संभ्रम दूर व्हावा, नागरिकांना कोरोनाबाबतची योग्य ती माहिती अधिकृतरित्या उपलब्ध व्हावी, परदेशवारी करून आलेल्या नागरिकांना थेट संपर्क साधता यावा अशा एक ना अनेक उद्देशांनी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयातील ‘कोरोना माहिती कक्ष’मधील दुरध्वनी सातत्याने खणखणू लागला आहे.
सुदैवाने कोरोना संक्रमित रुग्ण अद्याप नाशिकमध्ये आढळून आलेला नाही; मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्याकरिता आवश्यक तीतक्या प्रमाणात खबरदारी घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाकडून युध्दपातळीवर सतर्कता बाळगली जात आहे. तसेच नागरिकांमध्येही कोरोनाबाबतची जनजागृतीला वेग आला आहे. आयएमएसारख्या संस्थांकडूनही जनजागृतीवर भर दिला जात आहे. नागरिकांना कोरोना आजाराविषयीची माहिती मिळावी यासाठी कोरोना माहिती कक्ष स्वतंत्ररित्या जिल्हा शासकिय रुग्णालयात स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामध्ये नियमितपणे परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परिचारिकांकडून आलेल्या दुरध्वनी रिसिव्ह करून संबंधितांना हवी असलेली माहिती दिली जाते तसेच त्यांचे कोरोना आजाराविषयीच्या शंकांचे निरसनही केले जाते. सुरूवातीला या कक्षात फारसे दुरध्वनी येत नव्हते; मात्र मागील काही दिवसांपासून दरदिवशी पंधरा ते वीस कॉल माहिती नियंत्रक्ष कक्षाला येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. कोरोना आजारासंबंधी कुठल्याही प्रकारची माहिती अथवा औषधोपचार, तपासणीबाबत हवे असलेले मार्गदर्शन माहिती नियंत्रण कक्षातून परिचारिकांद्वारे केले जात आहे.
जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर मदत केंद्रातच कोरोना माहिती नियंत्रण कक्ष आहे. याबाबतचा फलक मुख्य प्रवेशद्वारावरच दर्शनी भागात लावण्यात आला आहे. या कक्षात २४ तास परिचारिका उपलब्ध असतात. ड्यूटीनुसार परिचारिकांची या कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. आलेल्या चौकशीबाबतची माहिती नोंदवहीत संबंधितांकडून नोंदविली जाते. कोरोनाबाबत कोणी व कोठून कॉल केला? त्यांनी काय माहिती विचाली? याबाबतची नोंद येथे ठेवली जाते. कोरोनाबाबतच्या माहितीपत्रकेदेखील या कक्षात उपलब्ध करुन दिली जात आहे.

‘कोरोना’ माहिती कक्षासोबत असा साधा संपर्क
कोरोना माहिती कक्षासोबत संपर्क साधण्यासाठी दोन दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आले आहे. ०२५३- २५७६१०६ / २५७२०३८ या दोन दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यास आवश्यक ती माहिती सहज उपलब्ध होते.

Web Title: The corona information in the district hospital is ringing in the cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.