निसर्गदूत हरपला : पक्षी अभ्यासक बिश्वरूप राहा अनंतात विलीन
By अझहर शेख | Updated: December 3, 2018 15:05 IST2018-12-03T15:03:02+5:302018-12-03T15:05:06+5:30
त्यांचा अंतीम प्रवासही पर्यावरणपूरक व निसर्ग संवर्धनाचा संदेश देऊन गेला. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम येथे डिझेल शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

निसर्गदूत हरपला : पक्षी अभ्यासक बिश्वरूप राहा अनंतात विलीन
अझहर शेख, नाशिक :निसर्ग हेच आपले जीवन अन् पक्षी हाच निसर्गाचा अस्सल दागिना मानत त्याच्या संवर्धन संरक्षणासाठी आयुष्य वेचणारा निसर्गदूत व उत्तम पक्षी अभ्यासक बिश्वरूप राहा यांच्या रुपाने नाशिककरांनी गमावला. मुंबईचे हवामान पसंत पडले नाही आणि वीस वर्षांपुर्वी राहा हे नाशिक कर झाले. नाशिकला ते आले आणि येथील वातावरण निसर्गसौंदर्य, धरण परिसर, घाटमार्ग, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, गड, किल्ले यांची त्यांना भुरळ पडली. निसर्गावर अफाट प्रेम असलेल्या या व्यक्तीने आज मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर नाशिकच्या अमरधाम येथे शोकाकूल वातावरणात सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
भावी पिढीमध्ये पक्षी, निसर्ग, वन्यजीव यांच्याविषयी जागृती होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेत त्यांनी शहरातील विविध शाळा पिंजून काढल्या. तसेच ग्रामिण भागातदेखील त्यांनी शाळांना सातत्याने भेटी देत तेथील जंगलाचे महत्त्व पटवून देत पक्षीनिरिक्षणाची आवड निर्माण केली. चित्रकला स्पर्धा, जंगल शिवार फेरी असे कार्यक्रम ते मुलांसमवेत साततत्याने राबवित होते. १९९७ साली त्यांना शासनाच्या वतीने मानद वन्यजीव संरक्षक म्हणून निवडण्यात आले होते. या पदावर त्यांनी नाशिक वनविभागासोबत सुमारे १२ वर्षे कार्य केले. वन-वन्यजीव संवर्धनाचे मिशन हाती घेत त्यांनी वनविभागाच्या विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन केले. नागरिकांमध्ये पक्ष्यांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी राहा यांनी सातत्याने प्रयत्न केले. गंगापूर धरणाच्या जवळच असलेल्या त्यांच्या फार्महाऊसलगत त्यांनी ‘विहंगम निसर्ग परिचय केंद्र’ उभारले आहे. या केंद्रात विविध पक्ष्यांविषयीची शास्त्रशुध्द माहिती सचित्र त्यांनी उपलब्ध करुन दिली आहे. पक्षी केंद्रात प्रवेशासाठी कुठल्याहीप्रकारचे शुल्क आकारले जात नाही. हे परिचय केंद्र त्यांच्यानंतरही त्यांची जनजागृतीची चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
जगाच्या पाठीवरून नामशेष होत असलेला गिधाड पक्ष्याच्या संवर्धनासाठीही त्यांनी मोहिम हाती घेतली होती. नाशिकमधील अंजनेरी, ब्रम्हगिरी, बोरगड, चामरलेणी या परिसरात गिधाडांचे वास्तव्य त्यांना आढळून आले होते. ब्रम्हगिरी, अंजनेरी, बोरगड भागातील डोंगररांगेत त्यांनी गिधाडांची घरटी शोधून वनविभागाला त्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर वनविभागाने अंजनेरी भागात गिधाड संवर्धन क्षेत्र विकसीत करण्यासाठी पाऊले उचलली.
२००४ साली ‘बर्डस आॅफ नाशिक डिस्ट्रीक्ट’ हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले होते. तसेच ‘मैत्री करुया पक्ष्यांशी’ ही पक्ष्यांची ओळख करुन देणारी पक्षीसूचीही प्रकाशित केली होती. जिल्ह्यातील हरसूल, पेठ, सुरगाणा, वणी, दिंडोरी या आदिवासी भागात त्यांनी गलोल बंदीसाठी जनजागृती मोहिम हाती घेत ७२ गावे पिंजून काढली होती. निसर्गासाठी आयुष्य वेचलेल्या या व्यक्तीच्या इच्छेनुसार त्यांचा अंतीम प्रवासही पर्यावरणपूरक व निसर्ग संवर्धनाचा संदेश देऊन गेला. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम येथे डिझेल शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या निधनाने नाशिकच्या निसर्गमित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. वनविभागाच्या अधिकाºयांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. शहरातील पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ, दत्ता उगावकर, नारायण भुरे, अनिल माळी तसेच नांदूरमध्यमेश्वर येथील पक्षी गाईड गंगाधर अघाव, अमोल दराडे यांना त्यांच्याकडून सतत मार्गदर्शन मिळत होते.
---शोकभावना---
नाशिकला राहा यांनी कारखाना काढला; मात्र निसर्गप्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. नाशिकमध्ये असलेली निसर्गसंपदा त्यांना खुणावत होती. त्यांनी पक्षीनिरिक्षणासोबत त्यांच्या संवर्धनाचा वसा घेत कार्य सुरू केले. भावी पिढीला पक्ष्यांची माहिती देत त्यांनी नाशिकमध्ये रानपिंगळा, माळढोक सारखे पक्षी शोधले होते. निसर्गावर अफाट प्रेम करणारा एक उच्चशिक्षित पक्षी अभ्यासक नाशिककरांनी गमावला.
- दिगंबर गाडगीळ, ज्येष्ठ पक्षीमित्र
गिधाडसारख्या दुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्याच्या संवर्धनासाठी राहा सर यांनी केलेले प्रयत्न न विसरता येणारे आहे. उत्तम पक्षी अभ्यासक असलेला हा व्यक्ती निसर्गवेडा होता. बोरगड संवर्धन क्षेत्र घोषित केले जावे, यासाठी त्यांनी वनविभागाकडे सातत्याने पाठपुरावा करुन यश मिळविले. नाशिकमध्ये पक्षीनिरिक्षणाला दिशा देण्याचे अमुल्य कार्य त्यांनी केले. त्यांचे कार्य त्यांनी उभारलेल्या विहंगम निसर्ग परिचय केंद्रातून पुढे असेच चालू राहणार आहे.
- अनिल माळी, पक्षीप्रेमी
पक्षीप्रेम, निसर्गप्रेम कसे असावे हे बिश्वरुप राहा यांना भेटल्यावर जाणवले. ‘प्रेम’ शब्दाची व्याख्या त्यांच्याकडून समजली. प्रेमी म्हटल्यावर ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी उभे आयुष्य वेचणारा हा अवलिया अचानकपणे आपल्यातून निघून गेला. त्यांचे पक्षीसंवर्धन व निसर्गसंवर्धनाचे कार्य अफाट आहे. त्यांनी निसर्गाच्या संवर्धनासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असेच आहे.
- नारायण भुरे, सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक तथा सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, नाशिक