काँग्रेससाठी सर्वसमावेशकताच महत्त्वाची !
By Admin | Updated: July 30, 2016 22:51 IST2016-07-30T22:50:41+5:302016-07-30T22:51:01+5:30
काँग्रेससाठी सर्वसमावेशकताच महत्त्वाची !

काँग्रेससाठी सर्वसमावेशकताच महत्त्वाची !
किरण अग्रवाल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाशकात आल्याने चैतन्य हरविलेल्या या पक्षात व त्याच्या कार्यकर्त्यांत नवा उत्साह जागणार असला तरी तो टिकवून ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. सद्य राजकीय स्थितीत अन्य पक्षीयांचे अपयश लोकांपुढे नेल्यास काँग्रेसलाही ‘अच्छे दिन’ येऊ शकतात. पण त्यासाठी स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला त्यांच्या स्वपक्षातीलच इतरांचे सहकार्य लाभणे गरजेचे आहे.यशाने हुरळून न जाता अगर अपयशाने विचलित न होता, आहे त्या परिस्थितीत कार्यरत राहण्याच्या बाबतीत काँग्रेसचा ‘हात’ अन्य कोणत्याही पक्षाला धरता येऊ नये. काँग्रेस मुक्ततेच्या कोणी कितीही घोषणा केल्या तरी, इतिहासाची पाने चाळता, सार्वत्रिक पातळीवर अनेकविध अनुकूल-प्रतिकूलनेतून हा पक्ष उठून उभा राहिलेला दिसून येतो, कारण सर्वसमावेशकता हा या पक्षाचा पाया वा मुलाधार राहिला आहे. नाशकात प्रभावहीन ठरलेल्या किंवा स्पष्टच सांगायचे तर, गतप्राण झालेल्या काँग्रेसच्या शिडात हवा भरण्यासाठी हाच मंत्र कामी येणार असून, त्यादृष्टीने पक्षधुरिणांनी चालविलेले प्रयत्न या पक्षाच्या कार्यकर्त्यांत आत्मविश्वास जागवणारेच ठरावेत.
अवघ्या सात-आठ महिन्यांनी येऊ घातलेल्या नाशिक महापालिका व जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या आणि जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी चालविली असली तरी काँग्रेस मात्र आता आतापर्यंत त्यात मागेच होती. नाशकात शिवसेना, भाजपा व मनसेनेही यासंदर्भात आघाडी घेतलेली दिसून येत असताना दोन्ही काँग्रेस गलीतगात्र झाल्यागत आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण अशी की त्यांचे नेते छगन भुजबळ ‘आत’ असल्याने स्थानिक पक्ष नेते-कार्यकर्तेही त्यातून ओढवलेल्या हबकलेपणातून बाहेर आलेले नाहीत. काँग्रेसचे म्हणायचे तर स्थानिक नेतृत्वाबद्दलची म्हणजे, शहराध्यक्षांप्रतिची स्वीकारार्हता लाभू शकलेली नाही. या पदावरील व्यक्ती बदलण्याचे अनेक प्रयोग करून बघितले गेलेत; परंतु जो त्या खुर्चीत येतो त्याच्या विरुद्ध सारे एक होताना दिसून येतात. त्यामुळे अलीकडेच्या काळात कुणालाच काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून आपल्या कामकाजाचा व पर्यायाने पक्षाचा प्रभाव जनमानसात निर्माण करता येऊ शकलेला नाही. मध्यंतरी तर याच राजी-नाराजीतून ‘समांतर काँग्रेस’ चालविण्याचेही प्रकार काही जणांकडून घडून आल्याने प्रदेश कमिटीने शहराध्यक्ष पदावरील व्यक्तीचा बदल करून अस्थायी स्वरूपात शरद अहेर यांची नियुक्ती केली व नंतर तोच निर्णय कायमही केल्याचे सांगितले जाते; परंतु त्यानेही संबंधितांची नाराजी अगर त्रयस्थता फारशी दूर होऊ शकलेली नाही. अशाही स्थितीत अहेर यांनी आपल्या गटाच्या बळावर का असेना, ओस पडलेल्या काँग्रेस कमिटीत काही ‘डोकी’ वाढविण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळात काही आंदोलने करून शहरातील काँग्रेस संपलेली नाही, हे दाखवून देण्याचाही प्रयत्न केला. पण, त्यांना इतरांची म्हणावी तशी साथ लाभताना दिसत नाही. अहेरांनी घेतलेल्या सर्वच कार्यक्रमांमध्ये काही माजी अध्यक्षांच्या गटांची गैरहजेरी नेहमीच चर्चित ठरत आली. जिल्ह्याचा कारभार राजाराम पानगव्हाणे निभावून नेत असले तरी त्यांच्यानंतर ती जबाबदारी सांभाळू शकेल असे नेतृत्वच पुढे येताना दिसत नाही. त्यामुळेच काँग्रेसच्या धुरिणांना आता ‘सर्वसमावेशकते’चा नारा देऊन पक्षात प्राण फुंकण्याची वेळ आली आहे.
काँग्रेसच्या सुदैवाने या पक्षाला पुन्हा भरारी घेण्यासारखी राजकीय परिस्थिती नाशकात आकारास आलेली आहे. नाशिक महापालिकेत सत्ता भूषवून झालेल्या शिवसेना, भाजपा व विद्यमान ‘मनसे’ या तिघा पक्षीयांकडूनही भ्रमनिरास झाला आहे. या संस्थेतील कामकाजाची नितनवी लक्तरे प्रतिदिनी वेशीवर टांगली जात आहेत. महापालिकेत काँग्रेसच्या शेवटच्या महापौर राहिलेल्या डॉ. शोभा बच्छाव यांच्या कार्यकाळात झालेली कामे जशी दाखवता येतात तशी त्यानंतरच्या काळातील सत्ताधाऱ्यांची फारशी चमकदार कामे दाखवता येत नाहीत. महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेनेही कंबर कसली आहे व अन्य पक्षांमधून त्या पक्षात जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे हे खरे; पण त्या पक्षातील अंतर्गत लाथाळीच नेहमी त्यांच्या मुळावर उठत आल्याचा अनेक बाबतीतला आजवरचा इतिहास आहे. शहरातील तीन आमदारांच्या बळावर व पुन्हा ‘नमो’ करिष्म्यावर महापालिकेचे मैदान मारण्यासाठी भाजपाही सिद्ध झालेली असली तरी राज्य सरकारने घेतलेल्या काही निर्णयांबद्दलची नाराजी नीट ‘कॅश’ करता आली तर अन्य राजकीय पक्षाला त्या पोकळीत आपली जागा बनवता येऊ शकेल. विशेषत: नाशिकचा औद्योगिक विकास खुंटलेला असताना विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना वीज सवलत देत नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला सापत्न वागणूक देण्याचा विषय असो की, वनविभागाचे कार्यालय व एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पातील संचाचे नाशकातून अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यासारखे प्रयत्न; या बाबी नाशिककरांना रुचलेल्या नाहीत. भाजपाचा सहयोगी असलेल्या शिवसेनेने त्यावर रान पेटवले आहेच, आता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसनेही मतदारांना त्याबाबत अवगत करून दिले तर या पक्षासाठी अनुकूलता निर्माण होणे अवघड नाही. जिल्हा परिषदेत सत्ता भूषवणाऱ्या राष्ट्रवादीची अवस्थाही समाधानकारक नाही. गेल्या तीनही पंचवार्षिक काळाचा विचार करता तेथील सत्तेमुळे राष्ट्रवादीला म्हणून काही लाभ झाला असे अपवादानेच म्हणता यावे. वेळोवेळी पक्षधुरिणांनी तंबी देऊनही तेथील सत्ताधाऱ्यांचे कामकाज सुधारत नसल्याचेच दिसून येते. त्यामुळे खुद्द राष्ट्रवादीच्याच सदस्यांना आता कोणती कामे घेऊन किंवा कोणत्या तोंडाने लोकांच्या दारात पुन्हा मते मागायला जायचे, असा प्रश्न पडला आहे. या साऱ्या परिस्थितीचा लाभ काँग्रेसला उचलता येणे शक्य आहे. कारण स्वत:च्या यशापेक्षा समोरच्यांचे अपयशच काँग्रेससाठी लाभदायी ठरू शकणारे आहे. पण, प्रश्न असा आहे की स्थानिक पातळीवर यासंबंधीचे शिवधनुष्य पेलू शकेल असे नेतृत्व काँग्रेसकडे आहे का?
काँग्रेसच्या तिकिटावर निवडून वा नियुक्तले जाऊन विविध मान-सन्मानाची पदे भूषविलेले अनेकजण आज हाताची घडी घालून त्रयस्थाच्या भूमिकेत वावरत आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांना अडचणीचे ठरू नये म्हणून ज्यांना प्रदेश स्तरावर धाडण्यात आले आहे ते पाहुण्यासारखे कार्यक्रमांना येतात आणि निघून जातात अशी ओरड आहे. त्यामुळे ज्येष्ठत्वाच्या नात्याने कुणी कुणाला मार्गदर्शन करावे व ते ऐकणाऱ्यानेही संबंधिताचा मान ठेवून ऐकून घ्यावे, असे काही होतानाच दिसत नाही. जिल्ह्यात दोन आमदार आहेत, तेही आपापल्या मतदारसंघातच अडकून पडले आहेत. मग पक्ष पुढे न्यायचा कुणी? सत्ता असताना सारेच गोळा होतात; पण आज सत्ता नसल्याने तेच सारे मरगळल्यागत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जात रणशिंग फुंकताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह पक्ष निरीक्षक व अन्य धुरिणांनी केवळ जाती-धर्माच्याच पातळीवर नव्हे तर पक्षातील सर्वांना सोबत वा विश्वासात घेऊन वाटचाल करण्याची व सामान्य माणसाच्या मनात पक्षाबद्दलचा विश्वास जागविण्याची जी मार्गदर्शक भूमिका घेतली आहे, तीच या पक्षाला नवीन उभारी देऊ शकणार आहे. स्थानिक काँग्रेसजनांनी ती मनावर घेतली तर या पक्षातील मरगळ निश्चितच दूर होऊ शकेल.