लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : समृद्धी महामार्गाचे सर्वेक्षण, मोजणी व खासगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदीस विरोध असल्याचे निवेदन सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले. पाथरे खुर्दच्या हद्दीतून गेलेल्या गोदावरी उजव्या कालव्याचा जय मल्हार उपसा जलसिंचन सोसायटीमार्फत गेल्या ४० वर्षांपासून लाभ घेत असल्यामुळे पाथरे परिसरातील शेती सुजलाम् सुफलाम् झालेली आहे. कालव्याच्या पाणलोट क्षेत्रातून शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून सुमारे सहा किलोमीटरपर्यंत जलवाहिन्यांद्वारे पाणी नेऊन शेती बागायती केली आहे. डाळिंब, आंबा, द्राक्षे, ऊस, भाजीपाला पिके व दुग्ध व्यवसाय विकसित केलेला असून, वर्षभर त्याचे उत्पादन घेतले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाने जुना मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १२ विकसित करून शेतकऱ्यांना भूमिहीन होण्यापासून वाचवावे. माळशेज, लोणी, अहमदनगर मार्गे समृद्धी महामार्ग नेल्यास शासनाचे १० हजार कोटी रुपये व अंतर आणि वेळेचीही बचत होणार असल्याने या मार्गाचा विचार करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी मोर्चे, निदर्शने, निवेदनांद्वारे समृद्धी महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध दर्शविला आहे. तरीही शासनाने समृद्धी महामार्गासाठी जमिनी ताब्यात घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला असून, त्याची जबाबदारी शासनाचे विभागीय अधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांची राहणार असल्याचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना निवेदनात म्हटले आहे. यावेळी सिन्नर पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र घुमरे, सरपंच मच्छिंद्र चिने, आर. बी. चिने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
खासगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदीस विरोध
By admin | Updated: May 8, 2017 00:52 IST