आता नो टेन्शन! ऑनलाईन फसवणूक होताच करा तक्रार; पैसे मिळू शकतात परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:22 IST2021-12-22T16:21:41+5:302021-12-22T16:22:36+5:30
इंटरनेटचे मायाजाळ अत्यंत धोकादायक आहे. माहिती तंत्रज्ञानाचा अत्यंत सावधगिरीने वापर करणे बंधनकारक आहे. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत नाशिक सायबर पोलीस ठाण्यात ...

आता नो टेन्शन! ऑनलाईन फसवणूक होताच करा तक्रार; पैसे मिळू शकतात परत
इंटरनेटचे मायाजाळ अत्यंत धोकादायक आहे. माहिती तंत्रज्ञानाचा अत्यंत सावधगिरीने वापर करणे बंधनकारक आहे. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत नाशिक सायबर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचे सुमारे २६ गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांमध्ये एकूण पावणे तीन कोटींपेक्षा जास्त रकमेचा अपहार झाल्याचे समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, तत्कालीन पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक सुरेश कोरबू आदींनी परिश्रम घेत विविध गुन्ह्यांचा छडा लावला.
तीन तासांच्या आत करा तक्रार
१) एका मोठ्या व्यावसायिक समूहाच्या बँक खाते असलेल्या बँकेला त्यांच्या नावाने बनावट पत्र ई-मेलद्वारे पाठवून सायबर चोरट्यांनी तब्बल ३९ लाखांचा ऑनलाईन अपहार केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी तपास करत गोल्डन अवर्समध्ये माहिती मिळाल्याने त्वरित संबंधित बँकांच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून ज्या खात्यावर रक्कम जमा होत होती, त्या खात्यावरील व्यवहार तत्काळ थांबविण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे सुमारे १३ लाखांची रक्कम पुन्हा मिळविणे शक्य झाले.
२) दुसऱ्या एका गुन्ह्यात पोलिसांनी संशयित भामट्याचा शोध घेत त्यास कोईम्बतूर येथून ताब्यात घेतले. त्याची कसोशीने चौकशी केली असता त्याने फसवणूक केल्याची कबुली दिली. ऑनलाईन ५ लाख १५ हजार रुपयांना त्याने गंडा घातला होता. ती सगळी रक्कम पोलिसांनी वसूल केली.
१० ते १५ घटनांमधील पैसे परत
नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात दाखल २६ गुन्ह्यांपैकी एकूण दहा ते पंधरा गुन्ह्यांचा पोलिसांना छडा लावण्यास यश आले आहे. या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी शंभर टक्के तर काही घटनांमध्ये पन्नास टक्के रक्कम परत मिळविली आहे.
अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग करू नका आणि सोशल मीडियावर तिच्या मैत्रीचा स्वीकार करू नका. ऑनलाईन शॉपिंग करताना केवळ ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ला पसंती द्या.
जादा पैशांचे आमिष किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला अथवा दाखविल्या जाणाऱ्या भीतीला बळी पडू नका. गुन्हा घडल्यापासून पहिल्या दोन ते तीन तासांत सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
- सुरज बिजली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे