पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत साडेचार महिन्यांत ५८९२ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:45+5:302021-07-07T04:17:45+5:30
नाशिक : गेल्या वर्षी मार्च महिन्यात नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिरकाव केलेल्या कोेरोना विषाणूने ८३७८ नागरिकांचा बळी ...

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत साडेचार महिन्यांत ५८९२ बळी
नाशिक : गेल्या वर्षी मार्च महिन्यात नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिरकाव केलेल्या कोेरोना विषाणूने ८३७८ नागरिकांचा बळी घेतल्याचे आरोग्य खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून, हीच माहिती शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर नमूद करण्यात आली असली, तरी पहिल्या लाटेपेक्षाही दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक व मरणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याचे आरोग्य खात्याने केलेल्या ऑडिटमध्ये नमूद करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात नाशिक दाैऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पवार यांनी पहिल्या व दुसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या व मृत्यूची आकडेवारी याचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने मार्च २०२० पासून केलेल्या ऑडिटमध्ये एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या, त्यात झालेले मृत्यू व मृत्यूदर याबाबी नमूद करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये फक्त एकच रुग्ण आढळला. त्यानंतर मात्र चढ्या क्रमाने हा आकडा वाढतच गेला. साधारणत: डिसेंबर २० पर्यंत हा आकडा नऊ हजारांपर्यंत पोहोचला असून, त्यातही एप्रिल, मे या दोन महिन्यांत हजाराच्या आत रुग्ण असताना जून महिन्यापासून त्याने उचल खाल्ल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. जून ते डिसेंबर व त्यातही सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या थेट ३८ हजार ४९० पर्यंत पोहोचल्याचा विक्रम गेल्या वर्षी नोंदविला गेला आहे. पहिल्या लाटेतील एकूण एक लाख १८ हजार ३५३ बाधितांपैकी २४६२ रुग्ण दगावले. जिल्ह्याचा मृत्यूदर त्यावेळी अवघा २.०८ इतका राहिला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात आरोग्य विभागाच्या मते, १६ फेब्रुवारी २०२१ पासून नोंदविली गेली असून, फेब्रुवारीमध्ये साडेचार हजार रुग्ण अताना ७९ मृत्यू झाले. मात्र, मार्च महिन्यात हाच आकडा ५८७१२ रुग्णांपर्यंत, तसेच एका महिन्यात ५८८ रुग्ण दगावण्यापर्यंत पोहोचल्याने दुसऱ्या लाटेची तीव्रता तेव्हापासून वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिलमध्ये हाच आकडा दीड लाख रुग्णांपर्यंत तर महिनाभरात २८७६ मृत्यू झाले आहेत. एप्रिल व मे महिन्यात कायम असलेली लाट ३० जूनपर्यंत काही प्रमाणात ओसरली. जून महिन्याच्या अखेरीस साडेआठ हजार रुग्ण व मृत्यूचा आकडाही ३१२ वर येऊन थांबला आहे. याचवेळी मृत्यूदर मात्र ३.६३ टक्के इतका राहिला आहे.
------------
चौकट===
जिल्हा पहिल्यांदा हजाराखाली
गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात नेहमीच विक्रमी रुग्णसंख्या राहिली आहे. मात्र, रविवारी (दि. ४) पहिल्यांदाच जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९११ वर पोहोचली आहे. त्यातही पेठ तालुका पूर्णपणे मुक्त, तर सुरगाणा, त्र्यंबकेश्वरला अनुक्रमे एक व तीन रुग्ण आहेत. सिन्नर व निफाड या हॉटस्पॉट तालुक्यांमध्येही कमालीचे प्रमाण घटण्यास मदत झाली आहे.