आगारप्रमुखांना घेराव

By Admin | Updated: January 19, 2016 23:43 IST2016-01-19T23:42:30+5:302016-01-19T23:43:56+5:30

ताहाराबाद : बसस्थानकातील समस्या सोडविण्याची मागणी

Co-ordination of Depot Heads | आगारप्रमुखांना घेराव

आगारप्रमुखांना घेराव

ताहाराबाद : येथील बसस्थानकातील विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी संतप्त युवक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. १८) बसस्थानक आगारप्रमुख व परिवहन कर्मचाऱ्यांना घेराव घातला. आश्वासन देऊनही दोन वर्षांत कोणतीही कार्यवाही न केल्याने गांधीगिरी करत आगारप्रमुखांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
राज्य परिवहन महामंडळाच्या ताहाराबाद बसस्थानकाच्या समस्या सोडवाव्यात, यासाठी दोन वर्षांपूर्वी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण केले होते.
यावेळी दोन महिन्यात समस्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन परिवहन अधिकाऱ्यांनी दिले होते; मात्र अद्याप कोणतीही गैरसोय दूर न झाल्याने सटाणा आगाराचे प्रमुख कैलास पाटील, वाहतूक निरीक्षक एस.आर. कांबळे, रमेश सूर्यवंशी, वाय.जी. अहेर यांना सचिन कोठावदे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. नितीन पवार, माजी उपसरपंच यशवंत पवार, युवक काँग्रेस सरचिटणीस मिलिंद चित्ते व कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला.
बसस्थानकाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात विचारणा करूनही समस्या न सुटल्याने आगारप्रमुख पाटील यांना शाल-श्रीफळ देत सत्कार करून समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. बसस्थानकावरील प्रसाधनगृहाची दुरवस्था झाली असून, त्याठिकाणी सुलभ शौचालय अस्तित्वात येणे गरजेचे आहे.
स्थानकातील पथदीप बंद असल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. आवारातील रस्त्याची खडी निखळल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. बसस्थानकातील फरशी खराब झाली आहे. बसस्थानकाचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे. मांगीतुंगी येथे होणाऱ्या धार्मिक सोहळ्यापूर्वी परिवहन महामंडळाने बसस्थानक समस्यामुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.(वार्ताहर)

Web Title: Co-ordination of Depot Heads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.