मनमाडच्या दुर्गप्रेमींची अंगठ्याच्या सुळक्यावर चढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 17:45 IST2019-11-27T17:43:45+5:302019-11-27T17:45:14+5:30
मनमाड : येथून जवळच असलेल्या अंगठ्याच्या डोंगरावरील सुळक्यावर चढाई करण्याचा मान मनमाड शहरातील दुर्गप्रेमींना मिळाला आहे. साहसपुर्ण व रोमांचक असलेली ही चढाई सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

मनमाडच्या दुर्गप्रेमींची अंगठ्याच्या सुळक्यावर चढाई
अगदी शहराच्या दक्षिण भागात अंगठ्याच्या आकाराचा उत्तुंग सुळका आहे. याला हडबीची शेंडी किंवा अंगठ्याचा डोंगर या नावानेही ओळखले जाते. १२० फुटांचा हा सरळसोट सुळका दुरूनच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सुळक्या जवळून गाडी जाताना अगदी कमी अंतरावरून दर्शन होते. हा अवघड सुळका सर करण्याच्या मोहीमेमध्ये मनमाड येथील दुर्गप्रेमी प्रवीण व्यवहारे, अमोल खरे, डॉ. भागवत दराडे, अनिल निरभवणे, निलेश वाघ, गुरू निकाळे, तुषार गोयल, धनंजय भामरे, सुमंत अंबर्डेकर प्रमोद अहिरे आदीजण सहभागी झाल होते. नाशिकच्या पॉईंट ब्रेक अॅडव्हेंचर समूहाचे जॅकी साळुंखे, तुषार पाटील, चेतन शिंदे, अमोल तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठ वाजता मोहिमेला सुरुवात झाली. पायथ्यापासून शिखराच्या माथ्यापर्यंत आरोहण करताना काही ठिकाणी मेखा, पाचरी यांच्या साहाय्याने दोर लावून इतर सहकाऱ्यांना आरोहणाचा मार्ग सुकर केला. शिखर सर करताना सुळक्याचा खडक बराच सैल व निसरडा असल्यामुळे माती व खडक निसटत असतानाही अनुभवाच्या जोरावर गिर्यारोहकांनी भर उन्हात शिखर सर केले. मनमाडकर म्हणून अंगठ्याचा डोंगर सुळका आरोहण करण्याचा पहिला मान या समूहाला लाभला. शिखर माथ्यावर जाताच सर्वांनी एक थरारक अनुभव घेतला.