हवामानातील बदल भ्रष्ट जीवनशैलीचा परिपाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:15 IST2021-09-24T04:15:57+5:302021-09-24T04:15:57+5:30
सिन्नर : हवामानातील बदल ही केवळ नैसर्गिक प्रक्रिया नसून तो आपल्या भ्रष्ट जीवनशैलीचा परिपाक आहे. त्यामुळे हवामान बदल ही ...

हवामानातील बदल भ्रष्ट जीवनशैलीचा परिपाक
सिन्नर : हवामानातील बदल ही केवळ नैसर्गिक प्रक्रिया नसून तो आपल्या भ्रष्ट जीवनशैलीचा परिपाक आहे. त्यामुळे हवामान बदल ही गोष्ट आपल्या नियंत्रणाबाहेरची नसून त्यात आपण गुणात्मक सुधारही करू शकतो, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. प्रदीप पुरंदरे यांनी केले. युवा मित्रचे संस्थापक दिवंगत सुनील पोटे यांच्या ५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘नदी पुनर्जीवन आणि दुष्काळ मुक्तीसाठी परिसंस्था संरक्षण’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. युवा मित्रचे अध्यक्ष डॉ. संपत काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेचे कार्यकारी संचालक अनिकेत लोहिया, युवा मित्रचे विश्वस्त रोहित जैन, कार्यकारी संचालक मनीषा पोटे, दीप्ती राऊत, मुक्ता पोटे, विश्वस्थ रोहित जैन प्रत्यक्ष, तर आयआयटी मुंबईचे प्रा. ओम दमाणी, पाणी पंचायतच्या कार्यकारी विश्वस्त सोनाली शिंदे ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या. दिवंगत सुनील पोटे आणि युवा मित्रचा आदर्श समोर ठेवून मराठवाड्यात सुरू असलेल्या प्रक्रिया उद्योग आणि शेतकरी उत्पादक संस्थांबाबत मानवलोक संस्थेचे लोहिया यांनी माहिती दिली. इगतपुरी येथील रयत विकास फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मनोज सहाणे, लोणारवाडीचे सरपंच डॉ. सदाशिव लोणारे, कृषक मित्रच्या संजय जोशी यांनी प्रश्नोत्तरात भाग घेतला. युवा मित्रच्या सहसंचालक शीतल डांगे यांनी प्रास्ताविक केले. दीप्ती राऊत यांनी युवा मित्रच्या पुढील वाटचालीबाबत विवेचन केले. युवा मित्र संस्थेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
----------------------
‘शिक्षण, आरोग्य, शेती व्यवस्थेत हवे बदल’
देशाच्या ७५ वर्षांच्या वाटचालीत आपण निर्मळ ग्रामीण जीवन गमावले आहे. मातीचे आरोग्य बिघडवून टाकले आहे. आज शिक्षण, आरोग्य आणि शेती या तिन्ही व्यवस्था धोक्यात असून, त्याबाबत तातडीने दुरुस्ती केली नाही तर भविष्य अंधकारमय असेल, अशी भीती पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. युवा मित्रने सिन्नर तालुक्यातील ‘आदर्श गाव’ संकल्पनेसाठी निवडावे. मी स्वत: त्यासाठी पुढील दोन वर्षे वेळ देईल, असा शब्द पोपटराव पवार यांनी दिला.