दुचाकीने क्लासला जाताना दहावीतील विद्यार्थी ठार
By संदीप भालेराव | Updated: June 27, 2023 20:13 IST2023-06-27T20:13:22+5:302023-06-27T20:13:35+5:30
योगेश केणे, भावेश केणे हे दोघे बंधू गंभीर जखमी झाले.

दुचाकीने क्लासला जाताना दहावीतील विद्यार्थी ठार
नाशिक : मोटारसायकलवर ट्रिपल सीट क्लासला जात असताना मंगळवारी (दि.२६) सकाळी झालेल्या अपघातात दहावीत शिकणारा विद्यार्थी जागीच ठार झाला तर दुचाकीवरील अन्य दोघे विद्यार्थी गंभीर झाले आहेत. सातपूर अंबड लिंक रोडवर हा अपघात घडला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जाधव संकुल येथून इयत्ता दहावीत शिकणारा सार्थक दामू राहाणे (वय १७) हा विद्यार्थी (एमएच १५ बीडब्ल्यू २३११) मोटारसायकलने योगेश केणे व भावेश केणे या दोन्ही मित्रांना घेऊन सातपूर कॉलनीतील क्लासला जात होता. सातपूर अंबड लिंक रोडवरील ज्योती फार्मसमोर त्यांची मोटारसायकल घसरली आणि दुभाजकावर जाऊन आदळल्याने सार्थक राहाणे (मोटारसायकल चालक) हा जागीच ठार झाला. योगेश केणे, भावेश केणे हे दोघे बंधू गंभीर जखमी झाले.
अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये पहिली शिफ्टसाठी कामावर जाणाऱ्या कामगारांनी हा अपघात पाहिल्याने त्यांनी त्वरीत धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांना अपघाताची माहिती दिली. सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सातपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली असून वाघचौरे पुढील तपास करत आहेत.