शहराचे तापमान ३५ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:41 IST2019-06-23T00:41:08+5:302019-06-23T00:41:27+5:30
मागील चार दिवसांपासून शहराचे तापमान पुन्हा तिशीपार सरकत असून, शनिवारी (दि.२२) कमाल तापमान ३५.३ अंशांवर पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. गुरुवारपासून शहराच्या वातावरणात उष्मा वाढत असून कमाल, किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने नाशिककर पुन्हा घामाघूम होताना दिसत आहे.

शहराचे तापमान ३५ अंशांवर
नाशिक : मागील चार दिवसांपासून शहराचे तापमान पुन्हा तिशीपार सरकत असून, शनिवारी (दि.२२) कमाल तापमान ३५.३ अंशांवर पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. गुरुवारपासून शहराच्या वातावरणात उष्मा वाढत असून कमाल, किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने नाशिककर पुन्हा घामाघूम होताना दिसत आहे.
जून महिना सरत आला असून, अखेरच्या आठवड्याला प्रारंभ झाला आहे. मात्र अद्याप पावसाला समाधानकारक अशी सुरुवात होऊ शकलेली नाही. परिणामी शहराच्या वातावरणात पुन्हा उष्णता वाढताना अनुभवयास येत आहे. पारा ३५ अंशांच्या पुढे सरकत असल्याने वातावरणात दमटपणा जाणवू लागला असून, नाशिककरांना उकाड्याचा त्रास जूनच्या अखेरीसही सहन करावा लागत आहे. यंदा मान्सूनचे राज्यात उशिराने आगमन झाले. ‘वायू’ वादळामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आणि अचानकपणे मान्सूनचा प्रवास लांबणीवर पडला.
गुरुवारी (दि.२०) मान्सूनने कोकणातून राज्यात प्रवेश केला. यावर्षी पावसाने राज्यात उशिराने वर्दी दिली आहे. शहरासह जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा शिगेला पोहोचली असून, पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांपासून सर्वच हवालदिल झाले आहेत.
जूनअखेरीस पावसाला सुरुवात होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप तशी स्थिती निर्माण होऊ न शकल्यामुळे वातावरणात उष्मा टिकून आहे. जूनच्या पंधरवड्यापासून कमाल तापमानाने तिशी ओलांडली आहे. तसेच किमान तापमानदेखील विशीच्या पुढे सरकले आहे. ३१ अंशांवरून कमाल तापमान थेट ३५ अंशांच्या पुढे गेले आहे.