नाशिक शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:08 IST2018-01-28T23:41:07+5:302018-01-29T00:08:24+5:30
शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट वाढला असून, पंचवटी परिसरातून रिक्षा तर इंदिरानगर परिसरातून तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ अशोकस्तंभ परिसरातील घारपुरे घाट येथील रहिवासी दत्तात्रय जाधव यांची ४५ हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच १५, झेड ६१२४) चोरट्यांनी गुरुवारी (दि़२५) मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरून चोरून नेली. या प्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट
नाशिक : शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट वाढला असून, पंचवटी परिसरातून रिक्षा तर इंदिरानगर परिसरातून तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ अशोकस्तंभ परिसरातील घारपुरे घाट येथील रहिवासी दत्तात्रय जाधव यांची ४५ हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच १५, झेड ६१२४) चोरट्यांनी गुरुवारी (दि़२५) मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरून चोरून नेली. या प्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोधलेनगर येथील रहिवासी तरुण मोदियानी यांची ४० हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड दुचाकी (एमएच १५, इडी ३३७२) ५ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी इच्छामणी लॉन्सजवळून चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरावाडी येथील रहिवासी रतन तरोटे यांची ३० हजार रुपये किमतीची अॅक्टिवा (एमएच १५, एफएच २१३१) दुचाकी व राणेनगर पोलीस हौसिंग सोसायटीतील सोनाली हांडगे (रा. राणेनगर पोलीस हौसिंग सोसायटी) यांची ४० हजार रुपये किमतीची अॅक्सेस (एमएच १५, एफएक्स ३३२४) दुचाकी चोरट्यांनी शनिवारी (दि.२७) सकाळी डब्ल्यूएनएस समोरील पार्किंगमधून चोरून नेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकूचा धाक दाखवून लूट
इलेक्ट्रिक दुकानदाराला चाकूचा धाक दाखवून दोघा संशयितांनी दुकानातील मायक्रोव्हेव बळजबरीने घेऊन गेल्याची घटना गंजमाळ परिसरातील मास्टर मॉलमध्ये घडली़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित शकील यास अटक केली असून, त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे़ श्याम मोटवाणी (राक़ॉलेजरोड, नाशिक) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित शकील ऊर्फ हंबा शाकीर कुरेशी (३२, रा. खडकाळी) व त्याचा साथीदार जान्या सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मास्टर मॉलमध्ये आले़ त्यानंतर चाकूचा धाक दाखवून शारीरिक तसेच मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी देऊन दुकानातील सुमारे दहा हजार रुपये किमतीचे मायक्रोव्हेव बळजबरीने घेऊन गेले़ या प्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़