शहरात पुन्हा ‘चिवचिवाट’
By Admin | Updated: March 20, 2015 00:05 IST2015-03-20T00:00:53+5:302015-03-20T00:05:23+5:30
जागतिक चिमणी दिन : जनजागृतीमुळे चिमणी संवर्धनाबाबत नाशिककरांचा वाढता पुढाकार

शहरात पुन्हा ‘चिवचिवाट’
नाशिक : या चिमण्यांनो परत फिरा रे... असे मराठी गीत चिमण्यांच्या घटत्या संख्येवरून रचण्यात आले आहे; मात्र गेल्या दोन वर्षांपासून शहरात चिमणी संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, शहरातील विविध इमारतींमध्ये तसेच बंगल्यांच्या परिसरातील उद्यानातील वृक्षांवर कृत्रिम घरटे नागरिकांकडून लावले जात आहेत. तसेच मातीच्या पात्रात पाणीदेखील नागरिक ठेवू लागल्याने शहर व परिसरात पुन्हा चिऊताईचा चिवचिवाट कानी पडू लागला आहे. अशोकस्तंभासारख्या गजबजलेल्या ठिकाणीसुद्धा शेकडो चिमण्या ‘दर्शन’ देत आहेत.
चिमण्यांच्या घटत्या संख्येमुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात असताना बहुतांश संस्था तसेच पक्षिपे्रमींकडून चिमणी संवर्धनासाठी जनजागृतीवर भर देण्यास प्रारंभ केला. चिमणी पक्ष्याविषयीची माहिती देत शहरातील काही पक्षिप्रेमींनी लाकडी कृत्रिम घरटे बनवून मोफत वाटप करण्यास सुरुवात केली. नागरिकांमध्येही चिमण्यांविषयीचे प्रेम वाढीस लागले. काठे गल्लीत तर ‘आस्था’ नावाच्या इमारतीमध्ये शेकडो चिमण्या कृत्रिम घरट्यांमध्ये तसेच येथील मोकळ्या भूखंडावरील बाभळीच्या वृक्षावर वास्तव्यास असल्याचे पहावयास मिळतात. एकूणच नाशिककरांकडून चिमण्यांच्या बाबतीत दाखविल्या जाणाऱ्या प्रेमापोटी चिऊताईलाही शहराच्या लोकवस्तीचा लळा लागला आहे.
अशोकस्तंभावरील एका चहाविक्रेत्याने धान्य व बिस्कि टांचे खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देत शेकडो चिमण्यांना आपलेसे केले आहे. येथील उंबर, बाभूळ, चेरीची वृक्ष जणू चिमण्यांचे हक्काचं वस्तिस्थानच बनले आहे. या ठिकाणी शेकडो चिमण्या दिवसभर वर्दळ असतानादेखील पहावयास मिळतात. तसेच आनंदवली शिवारासह, उपनगर, इंदिरानगर, टाकळी फाटा, गंगापूररोड आदि परिसरातदेखील कृत्रिम अन्नपात्र, जलपात्र, घरटे नागरिकांनी घरांच्या खिडक्यांमध्ये तसेच बाल्कनीत लावलेले दिसतात. चिमणी संवर्धनासाठी शहराच्या मुख्य टपाल कार्यालयानेही पाऊल टाकले असून, येथील प्रवेशद्वारावर असलेल्या वृक्षांच्या छायेखाली उद्याननिर्मिती करण्याबरोबरच वृक्षांवर चिमण्यांसाठी कृत्रिम अन्नपात्र व घरटेदेखील लावली आहेत. एकूणच नाशिककरांच्या अशा एकत्रित पुढाकाराने गेल्या एक ते दोन वर्षांमध्ये शहराच्या लोकवस्तींमध्ये सकाळ-संध्याकाळ चिमण्यांचा थवा विहार करताना पहावयास मिळतो.