चांदवडला पतंग उडविण्याच्या नादात बालकाचा छतावरुन पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 17:40 IST2021-01-15T17:40:23+5:302021-01-15T17:40:52+5:30
चांदवड : पतंग उडविण्याच्या नादात बांधकाम सुरु असलेल्या घराच्या छतावरुन पडून अनिल ओलाराम सस्ते (८) या बालकाचा मृत्यू झाला आहे.

चांदवडला पतंग उडविण्याच्या नादात बालकाचा छतावरुन पडून मृत्यू
येथील श्री महालक्ष्मीनगर येथे बांधकाम सुरु आहे. त्या कामावर ओलाराम नारसिंग सस्ते (३५, रा. धावडा ता. सेंधवा) हे आपल्या बायको, मुलासह व इतर मजुरांसमवेत काम करत होते. मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी शेजारील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या छतावर पतंग खेळण्यासाठी गेलेल्या अनिलचा खेळण्याचा नादात अचानक छतावरुन तोल गेला. तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ऐन संक्रांतीच्या सणादिवशी झालेल्या या दुदैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलाच्या आईने घटनास्थळीच हंबरडा फोडला. चांदवड उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर करीत आहेत.