पतंग पकडतांना विहिरीत पडून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 17:20 IST2020-01-15T17:20:10+5:302020-01-15T17:20:43+5:30
सिन्नर : कटलेली पतंग पकडतांना पाय घसरुन विहिरीत पडल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहराजवळील मापारवाडी रस्त्यालगत घडली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

पतंग पकडतांना विहिरीत पडून बालकाचा मृत्यू
आर्यन विलास नवाळे (१२) रा. संत हरीबाबा नगर, सिन्नर हा सहावीत शिकणारा मुलगा त्याच्या मित्रांसोबत शेतात पतंग उडवत होता. यावेळी कटलेली पतंग पकडत असतांना तो धनंजय जाधव यांच्या शेतातील विहिरीत पाय घसरुन पडला. विहिर पाण्याने तुटंब भरलेली होती. आर्यन विहिरीत पडल्यानंतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. जवळ राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते विजय बोºहाडे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी सिन्नर पोलीस व नगरपरिषद अग्निशामक दलाला माहिती दिली. विहिरीत भरपूर पाणी असल्याने त्यात गळ टाकून शोधकार्य राबविण्यात आले. विलास गांगुर्डे, सागर गवळी, मनोज शिंदे यांच्यासह अग्निशामक दलाचे लाला वाल्मिक, नारायण मुंडे, जयेश बोरस्ते, हरिष पाटील यांनी विहिरीत शोधकार्य केले. त्यानंतर आर्यनचा मृतदेह मिळून आला. नगरपरिषद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.