रस्तेकोंडीवरून मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना कानपिचक्या

By Admin | Updated: August 7, 2015 01:13 IST2015-08-07T00:16:55+5:302015-08-07T01:13:42+5:30

कुंभमेळा : नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या केल्या सूचना

The chief minister's police racket | रस्तेकोंडीवरून मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना कानपिचक्या

रस्तेकोंडीवरून मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना कानपिचक्या

नाशिक : कुंभमेळ्यात सुरक्षेची काळजी घेत असताना, निर्बंधांचा अतिरेक करू नये. स्थानिक नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर पोलिसांना केल्या. कुंभमेळ्याच्या कारणावरून पोलिसांनी शहरात केलेल्या नाकाबंदीवरही मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करीत पोलिसांनी नागरिकांशी संवाद वाढवावा, अशा कानपिचक्याही त्यांना दिल्याचे वृत्त आहे.
एका कार्यक्रमासाठी नाशकात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे कुंभमेळा आढावा बैठक घेतली. गेल्या काही दिवसांपासून कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताचे कारण देत पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून, पोलिसांविरुद्ध संतप्त भावना व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सूचना दिल्याचे समजते. ते म्हणाले, पोलिसांनी सुरक्षा व सावधगिरीच्या सूचनांविषयी नागरिकांना विश्वासात घ्यावे. शहरात येणारे साधू, भाविकांबाबतही काय करावे, काय करू नये, याबाबत नागरिकांत जागरूकता निर्माण करावी. सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या बाहेरच्या जिल्ह्यातील पोलिसांनाही आवश्यक त्या सूचना केल्या जाव्यात.
दरम्यान, कुंभमेळ्याच्या काळात प्रशासनाच्या वतीने नागरिकांना पाठवण्यात येणारे लघुसंदेश इंग्रजीसह मराठी व हिंदीतही असावेत, अशी सूचना त्यांनी केली. कुंभमेळा निर्विघ्न पार पडेल, अशा पद्धतीने नियोजन व आपत्ती व्यवस्थापन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाविक व नागरिकांच्या सुविधेची विशेष काळजी घेण्याची सूचना करीत साधुग्राममधील गॅस व धान्याच्या पुरवठ्याकडे लक्ष पुरवण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले.

Web Title: The chief minister's police racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.