गोदावरी नदीत केमिकलयुक्त पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:55 IST2021-01-05T20:23:20+5:302021-01-06T00:55:54+5:30
सायखेडा : गोदावरी नदीच्या पात्रता तेलकट आणि काळा रंगमिश्रित पाणी आणि पानवेली वाहून आल्यामुळे अनेक मासे रात्रीपासून पाण्यावर तरंगत तडफडत असून, अनेक मासे मृत झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गोदावरी नदीत केमिकलयुक्त पाणी
गोदावरी नदी ज्या परिसरातून वाहात येते, त्या परिसरात मोठया प्रमाणात कारखाने आहे. अनेक ठिकाणी केमिकल कंपन्या असल्यामुळे, काही कंपन्या दूषित पाणी गोदावरी नदीत सोडतात. त्यामुळे पाणी खराब होते आणि पाण्यात असणारे जलचर प्राण्याच्या जिवाला धोका पोहोचतो. त्याशिवाय नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पानवेल वाहत येऊन सायखेडा येथील पुलाला अडकते. अनेक दिवस पानवेल एकाच ठिकाणी अडकून राहिल्यामुळे सडते आणि त्याचा परिणाम मत्स्य प्राण्यावर होतो. काल सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढला आणि त्यासोबत पानवेल वाहून आल्या. त्यासोबत पाण्यावर तेलकट रंग आणि काळसर पाणी झाल्यामुळे कुठेतरी केमिकलमिश्रित झाल्यामुळे नदीतील पाणी दूषित झाले. त्याचा परिणाम पाण्यात वास्तव्य करणाऱ्या जलचर प्राण्यांच्या आरोग्यवर होऊन अनेक मासे मृत पावले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळी उठल्यानंतर अनेक लोक नदी जवळ गेली असता, त्यांना पाण्यावर मासे तरंगताना दिसली, तर काही मासे पाण्यावर तडफडत होती. औद्योगिक विकास होत असताना जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात येत आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, अनेक दिवसांची पानवेल काढण्यात प्रशासन हतबल झाले आहे, केमिकल पाण्यात सोडणाऱ्या कंपन्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.