जिल्ह्यातील मतदार याद्यांची होणार तपासणी
By Admin | Updated: February 23, 2017 00:00 IST2017-02-22T23:59:56+5:302017-02-23T00:00:14+5:30
त्रुटींचा शोध : निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना

जिल्ह्यातील मतदार याद्यांची होणार तपासणी
नाशिक : नाशिक महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळामुळे मतदारांना वंचित राहावे लागल्याने जिल्हा निवडणूक यंत्रणेने सर्व तालुक्यांतील निवडणूक नायब तहसीलदारांकडून मतदार यादीचा अहवाल मागविला असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली यादी राज्य निवडणूक आयोगाच्या यादीशी जोडून पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, जाणकारांच्या मते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याद्या फोडताना मोठ्या प्रमाणावर कुचराई झाल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ५ जानेवारी २०१७ रोजी विधानसभा मतदार संघनिहाय मतदार याद्या जारी करण्यात आल्या होत्या. याच याद्यांच्या आधारे महापालिकेने केलेल्या प्रभाग रचनेनिहाय मतदारांची संख्या तर जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितीच्या गणातील मतदारांची संख्या ठरविण्यात आली होती. आयोगाने प्रभाग, गट व गणासाठी मतदार संख्या ठरवून दिलेली असल्याने त्याच आधारे निवडणूक यंत्रणेने मतदार यादीची फोड केली असली तरी, अशी फोड करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा जो काही डाटा मागविला, त्या डाटाच्या लेण-देण मध्येच बहुतेक तांत्रिक दोषामुळेच अनेक मतदारांची नावे गहाळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका हद्दीत प्रभागनिहाय मतदारांची संख्या निश्चित करताना ज्या भागांचा समावेश करण्यात आला, त्याच भागातील मतदान केंद्रनिहाय मतदारांची विभागणी होणे अपेक्षित होते, तथापि, मतदान केंद्रनिहाय मतदार यादीची निश्चिती करताना ती योग्य न झाल्याने नागरिकांच्या मतदान केंद्रात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याचे व त्यातूनच एकाच कुटुंबातील व्यक्तींची वेगवेगळ्या ठिकाणी विभागणी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातही बहुधा हाच प्रकार घडला असावा, असाही अंदाज व्यक्त करून प्रामुख्याने केंद्राकडून मतदारांचा डाटा घेताना व तो पुन्हा वापरताना ‘कट पेस्ट’चा गोंधळ झाला असावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे.