चंदनपुरी यात्रोत्सवास प्रारंभ
By Admin | Updated: January 23, 2016 22:33 IST2016-01-23T22:32:19+5:302016-01-23T22:33:08+5:30
मालेगाव : यळकोट यळकोट जय मल्हार

चंदनपुरी यात्रोत्सवास प्रारंभ
मालेगाव कॅम्प : मालेगाव तालुक्यातील प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे खंडोबारायाची यात्रा शनिवारी मोठ्या उत्साहात सुरू झाली. सकाळी खंडोबा मंदिरात सहकार राज्यमंत्री दादा भुसे, अनिता भुसे
यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
राज्यभरात ग्रामदेवता खंडोबा मल्हार भक्ताचे श्रद्धास्थान
आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदादेखील पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर यात्रेस प्रारंभ झाला. यासाठी शुक्रवारी जेजुरी येथून पायी
मशाल ज्योत मल्हार भक्तांनी चंदनपुरीमध्ये आणली. चंदनपुरीत ज्योतीसह खंडोबाच्या मुखवट्यांची पालखी मिरवणूक काढण्यात
आली.
या मिरवणुकीत खोबरे व मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळला गेला. यामुळे चंदनपुरी गावात पिवळी सोनेरी किनार प्राप्त झाली होती. यात्रेनिमित्त खंडोबा मंदिर व परिसरात सजावट, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात आली.
संशयित हालचाली टिपण्यासाठी चार सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत.
यात्रेत पूजेच्या वस्तू, भंडारा, खोबरे या साहित्यांसह शंभरहून अधिक दुकाने, हॉटेल थाटण्यात
आले आहेत. चारशेहून अधिक मनोरंजनाचे व खेळण्यांची दुकाने लावण्यात आली आहेत.
पंधरा दिवस सुुरू राहणार असलेल्या यात्रेत दहा ते बारा लाख मल्हार भक्तांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे. याप्रसंगी चंदनपुरीच्या सरपंच कु. योगीता अहिरे, उपसरपंच कु. केतकी पाटील यांच्यासह माजी सरपंच राजेंद्र पाटील, मा. पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, कॉँग्रेस नेते प्रसाद हिरेंसह ग्रामपंचायत सदस्य व असंख्य नागरिक व मल्हार भक्त उपस्थित होते. (वार्ताहर)