अपुऱ्या आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:53 IST2020-05-06T21:12:52+5:302020-05-06T23:53:23+5:30
कळवण: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यात विविध जिल्हा, राज्यातून १५११ नागरिक आले असून, त्यातील ५९३ नागरिकांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. त्यांच्यात कोणतेही कोरोनाबाबत लक्षण आढळून आलेले नाही.

अपुऱ्या आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान
कळवण: (मनोेज देवरे)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यात विविध जिल्हा, राज्यातून १५११ नागरिक आले असून, त्यातील ५९३ नागरिकांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. त्यांच्यात कोणतेही कोरोनाबाबत लक्षण आढळून आलेले नाही. मात्र मालेगाव येथे सेवेत असलेल्या तालुक्यातील एका पोलीस कर्मचाºयाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. सदर रुग्णावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. सदर पोलीस कर्मचाºयाचा त्याच्या घरातील व्यक्तीशी संपर्क आल्याने कुटुंबातील चार व एका मित्राला मानूर येथील कोरोना केविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. अभोणा येथे ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तयार करण्यात आले आहे. शहरी भागापाठोपाठ आता ग्रामीण व आदिवासी भागात कोरोनाचा शिरकाव झाला असून, तालुक्यातून कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्यामुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान, आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी ती अपुरी असल्याने कोरोनाविरुद्ध मुकाबल्याचे मोठे आव्हान आहे.
कळवण उपजिल्हा रुग्णालयात १२ वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असताना फक्त ५ जण कार्यरत आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मालेगावला वर्ग करण्यात आले आहे. कोरोनासंदर्भातील संशयित रुग्ण आढळून आल्यास कळवणला सक्षम वैद्यकीय अधिकारी नसल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडणार आहे. नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने गेलेले तालुक्यात परतले असून, काही नागरिकांनी अद्याप माहिती दिलेली नाही, त्याचाच धसका खासगी आरोग्य यंत्रणेने घेतला आहे.